२४४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
उन्नतीसाठी निजाम सरकारने उभारलेल्या एक कोटी रुपयांच्या ' शेड्यूल्ड कास्ट्स् ट्रस्ट फंडातून '१२ लाख रुपये कर्ज घेऊन सोसायटीने हे कॉलेज सुरू केलेले आहे. आम्हाला कर्ज बिनव्याजी दिल्याबद्दल फंडाच्या बोर्डाचा मी आभारी आहे. उपकार मानण्यासारखीच ही गोष्ट असली तरी वार्षिक ५०,००० (पन्नास हजार) रुपयांच्या हप्त्यांनी हे कर्ज फेडावयाचे आहे. ही गोष्ट सोसायटीला दृष्टीआड करता येणार नाही. ही परतफेड १९५६ पासून सुरू होणार आहे. या १२ लाख रुपये कर्जातून इमारत आणि इतर सामान-सुमान यावर खर्च करावयाचा होता. आतापर्यंत उपकरणे आणि फर्निचर यावर तीन लाख रुपये खर्च झालेले आहेत. हे वजा जाता साधारणपणे नऊ लाख रुपये सोसायटीच्या हातात राहातात. कॉलेजच्या इमारतीसाठी २० लाख रुपये लागतील असा अंदाज आहे. म्हणजे सोसायटीच्या बजेटात साधारणपणे ११ लाख रुपयांची तूट येते. सोसायटीची स्वतःची अशी काही तरतूद नाही. ही तूट भरून काढण्यासाठी सोसायटीला लोकांच्या देणगीवर अवलंबून राहावे लागते. सोसायटीने अंगीकारलेले कार्य पूर्णपणे बिनराजकीय स्वरूपाचे आहे. ते सर्वस्वी शैक्षणिक आणि सांस्कृतिक आहे. ज्याला इच्छा आणि शक्ती आहे अशा कुठल्याही राजकीय पक्षाच्या माणसाला या कार्यासाठी मदत करता येणे शक्य आहे. हैद्राबाद संस्थानातील मराठवाडा आणि औरंगाबादेतील जनतेला तसेच हैद्राबाद संस्थानाबाहेरील जनतेला उदार हाताने देणगी देऊन या शैक्षणिक कार्याला उत्तेजन देण्याची सोसायटीच्या वतीने मी विनंती करतो. मला आशा आहे की पुष्कळ लोक माझ्या विनंतीला मान देतील. आपले ध्येय साध्य करण्यासाठी सोसायटी किती अडचणीतून जात आहे हे यावरून दिसून येईल. सोसायटीवर दुहेरी ओझ्याचा भार आहे. इमारत पूरी करण्यासाठी ११ लाख रुपयांची आणि तदनंतर कर्ज फेडण्यासाठी वर्षाला ५० हजार रुपयांची तरतूद करावयाची आहे. तरीसुद्धा इमारत बांधणीस अनुकूल परिस्थिती येऊन पैसे मिळेपर्यंत सोसायटी थांबणार नाही. इमारतीचे काम सोसायटीला ताबडतोब सुरू करावयाचे आहे. मला आशा आहे की हा सोसायटीच्या कार्याविषयीच्या तळमळीचा आणि निश्चयाचा दाखला समजण्यात येईल. लोक जेव्हा प्रत्यक्ष काम सुरू असलेले पाहातील तेव्हा देणग्या मिळत जातील; असा सोसायटीला आत्मविश्वास वाटतो. विद्यार्थ्याच्या दृष्टीने कॉलेजची इमारत भव्य आणि शोभिवंत अशीच होणार आहे. शिल्पकलेच्या दृष्टीने तर औरंगाबाद शहराचा ती अलंकार ठरणार आहे.
हिंदू समाजाच्या अगदी खालच्या थरातून आल्यामुळे शिक्षणाचे किती महत्त्व आहे हे मी जाणतो. खालच्या समाजाची उन्नती करण्याचा प्रश्न आर्थिक असल्याचे मानण्यात येते. पण ही मोठी चूक आहे. हिंदुस्थानातील दलित