२७-१०-१९५१ मी नदीच्या प्रवाहालाच वळविणाऱ्या भक्कम खडकासारखा आहे - Page 286

२८०

मी नदीच्या प्रवाहालाच वळविणाऱया
भक्कम खडकासारखा आहे

मोहल्ला रामदासपुरा (बुटान मंडी) जालंदर येथे दिनांक २७ ऑक्टोबर १९५१ रोजी पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण झाले. ते म्हणाले,

बंधु आणि भगिनींनो,

यापूर्वीही अशा प्रकारच्या कार्यक्रमांची आखणी करून त्या कार्यक्रमात मी सहभागी व्हावे अशी अपेक्षा तुम्ही अनेकदा केली आहे. परंतु मुख्यतः मध्यवर्ती सरकारच्या मंत्रीपदाच्या जबरदस्त जबाबदारीमुळे व माझ्या ढासळत्या प्रकृतीस्वास्थ्यामुळे मी आपल्या कार्यक्रमात यापूर्वी सहभागी होऊ शकलो नाही. याबद्दल सुरूवातीसच मी आपली क्षमा मागतो. मला असे सांगण्यात आले की माझे भाषण ऐकण्यासाठी यापूर्वी आपण अनेकदा येथे गोळा झालात परंतु निराश होऊन तुम्हास परत जावे लागले आहे. म्हणून तुम्हाला हा जो त्रास झाला व निराश व्हावे लागले त्याबद्दल मी तुमची क्षमा मागू इच्छितो.

तुम्हाला माहीतच आहे की मागील चार वर्षे मी केंद्रीय सरकारात एक मंत्री होतो आणि भूतकाळातील कोणत्याही विधी मंत्र्याला जेवढा कामाचा बोजा वहन करावा लागला नसेल किंवा भविष्यातील कोणत्याही विधी मंत्र्याला वहन करावा लागणार नाही इतका कामाचा बोजा मला वहन करावा लागत होता. मी दौरा काढू शकलो नाही याचे हे एक कारण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे माझे प्रकृतिस्वास्थ्य ठीक नाही; आतासुद्धा माझी प्रकृती पूर्णतः ताळ्यावर आलेली नाही. माझ्या तब्येतीनेही माझ्या दौऱ्यात अडथळा निर्माण केला. तिसरी आणि शेवटची बाब म्हणजे या देशाच्या सर्व भागांमध्ये अस्पृश्य लोक आहेत. प्रत्येक तहसील, जिल्हा आणि प्रांतात जर मी दौरा काढण्याचे ठरविले तर चार किंवा पाच वर्षातही हा दौऱयाचा कार्यक्रम संपविणे मला शक्य होणार नाही. मी तुमच्या गावाला भेट देऊन तुमच्याशी हार्दिक संवाद करावा असा तुमचा माझ्यावरील प्रेमापोटी आग्रह असतो. यामागील माझ्यासंबंधी असलेली तुमची प्रेमभावना मी जाणतो. परंतु सर्व ठिकाणी जाणे मला असंभव आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाने स्वय॑निर्भर होऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि अशातऱ्हेने स्वतंत्र सामाजिक जीवन जगावे अशी माझी अपेक्षा आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे : संपा. मा. फ. गांजरे, खंड ७, पृ.४८-५६.