मी नदीच्या . . . . खडकासारखा आहे २४७
माझ्या वयाची ६० वर्षे मी पूर्ण केली आहेत. मी जर सरकारी नोकरीत असतो तर सेवानिवृत्त होण्याची सक्ती माझ्यावर करण्यात आली असती. पण हा नियम राजकारणी लोकांना लागू होत नाही. तसे असते तर बरे झाले असते. आजकाल असे दिसून येते की ज्यांना उदरनिर्वाहाची साधने नाहीत व बुद्धिमत्ता नाही असे ५५ वर्षे वयावरील लोक राजकारणी बनून आपला उदरनिर्वाह चालवीत आहेत.
मी राजकारणात असण्याचे कारण असे की राजकारणाच्या आखाड्यात उतरुन मला आता ३० वर्षांच्या वर काळ लोटला आहे. इतक्या लांब काळपर्यंत राजकारणात सतत वावरत असलेला एकही माणूस सध्या भारतात नाही. फावल्यावेळी राजकारण करणे हा एक सामान्य नियम आहे. या तीस वर्षापैकी आठ वर्षे मी केन्द्रीय सरकारचा सभासद म्हणून घालविली आहेत. या क्षेत्रात सुद्धा कोणीही माझ्या पुढे गेलेला नाही. माझी इच्छा असती तर आणखी काही काळ मी सरकारचा सभासद म्हणून राहू शकलो असतो.
परंतु जेव्हापासून मला जीवनाचा अर्थ समजू लागला तेव्हापासून म्हणजे माझ्या लहानपणापासूनच मी सतत एका तत्त्वाचे अनुसरण केले. ते तत्त्व म्हणजे माझ्या अस्पृश्य बांधवांची सेवा करणे हे होय. मी कोठेही असो किंवा कोणत्याही पदावर असो परंतु नेहमीच माझ्या बांधवांच्या भल्याकरिता मी चिंतन करीत असतो-व कार्य करीत असतो. दुसऱ्या कोणत्याही प्रश्नाला मी कधीही इतके महत्त्व दिलेले नाही. अस्पृश्यांच्या हिताचे संरक्षण मी केलेच पाहिजे हेच माझ्या भूतकाळातील जीवनाचे ध्येय होते आणि भविष्यातही हेच माझे ध्येय राहील. किफायतशीर अशा भल्या मोठ्या पगाराच्या अनेक नोकऱ्या मला देऊ करण्यात आल्या होत्या परंतु माझ्या लोकांची सेवा करणे हे माझ्या जीवनाचे ध्येय असल्यामुळे त्या नोकऱ्या
मी. नाकारल्या. |
परदेशातून अर्थशास्त्राची उच्च पदवी धारण करून येणारा केवळ अस्पृश्यातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातून मी पहिला माणूस होतो. मी मुंबईत उतरल्यावर ताबडतोब मुंबई सरकारने मला राजनैतिक अर्थशास्त्राच्या प्राध्यापकाची जागा देऊ केली. मी ती नोकरी स्वीकारली असती तर आज मला फार मोठा पगार मिळाला असता. परंतु मी ती नोकरी नाकारली कारण मला माहीत होते की तुम्ही एखादी सरकारी नोकरी पत्करल्यावर स्वभावतःच तुमच्या लोकांची सेवा करण्याच्या इच्छेवर बंधने येऊन पडतात. माझा उदरनिर्वाह होऊन मी स्वतंत्रही असावे म्हणून कायद्याच्या शिक्षणासाठी एक किंवा दोन वर्षानंतर मी पुन्हा इंग्लंडला गेलो. आपल्या उदरनिर्वाहासाठी दुसऱ्या कोणावरही जो अवलंबून नसतो तोच माणूस खऱ्या अर्थाने स्वतंत्र असतो.