२७-१०-१९५१ मी नदीच्या प्रवाहालाच वळविणाऱ्या भक्कम खडकासारखा आहे - Page 288

२४८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

बार-अंट-लॉ ची पदवी प्राप्त करून इंग्लंडमधून परत आल्यावर पुन्हा एकदा मला डिस्ट्रिक्ट जज्जाच्या जागेचे, तीन वर्षाच्या आत हायकोर्ट जज्जाच्या जागेवर पदोन्नती करण्याचे आश्‍वासन देऊन नेमणूक करण्याचे प्रलोभन दाखवण्यात आले. त्याकाळी माझे मासिक उत्पन्न १०० रु. सुद्धा नव्हते. अत्यंत गरीब लोकांसाठी मुद्दाम बांधलेल्या मुंबईतील एका चाळीतील एका खोलीत त्यावेळी मी राहात होतो. परंतु ही जज्जाची जागा जरी फार मोठ्या पगाराची होती आणि जन्मभर मला पैशाची ददात भासणार नव्हती तरीसुद्धा ती जागा मी नाकारली कारण ती जागा जर मी स्वीकारली असती तर स्वभावतःच माझ्या आयुष्याचे ध्येय गाठण्यात म्हणजे माझ्या लोकांची उन्नती करून त्यांची स्थिती सुधारण्याच्या माझ्या अंगीकृत कार्यात अडचण निर्माण झाली असती.

१९४२ साली पुन्हा एकदा अशाच एका प्रसंगाशी मला सामना करावा लागला. आर्थिकदृष्ट्या संपन्न करू शकणारी आणि दहा वर्षे नोकरी झाल्यावर पुढील आयुष्य मी सुखासमाधानात घालवू शकलो असतो अशी हायकोर्ट जज्जाची जागा मला देऊ करण्यात आली. व्हाईसरॉयच्या कौन्सिलमध्येसुद्धा जागा देण्याचे मला आश्‍वासन देण्यात आले. माझे जीवनध्येय डोळ्यापुढे ठेवून मी दुसरी जागा स्वीकारली. प्रत्येकाने आपल्या लोकांची सेवा करण्यात आपले आयुष्य वेचले पाहिजे व सेवेतच मरण पत्करले पाहिजे.

केन्द्रीय सरकारात १९४७ साली मी सामील झालो. मी काँग्रेसला मिळालो अशी टीका माझ्या काही टीकाकारांनी माझ्यावर केली. माझ्या टीकाकारांनी केलेल्या निंदेला मी लखनौच्या भाषणात उत्तर दिले आहे. त्या भाषणात माझ्या देशबांधवांना मी सांगितले की पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जाणाऱ्या मातीच्या ढेकळाप्रमाणे मी भुसभुशीत नसून मी पाण्यात न विरघळता नदीच्या प्रवाहालाच वळविणाऱ्या एखाद्या भक्कम खडकासारखा आहे. मी कोठेही असलो किंवा कोणाच्याही संगतीत मी राहिलो तरी माझे स्वत:चे वैशिष्ट्य मी कधीही गमावणार नाही. एखाद्या चांगल्या कामासाठी जर कोणी माझ्या सहकार्यासाठी विचारणा केली तर मी आनंदाने सहकार्य करीन. मागील चार वर्षेपर्यंत काँग्रेस सरकारशी मी माझ्या सर्व सामर्थ्यानिशी प्रामाणिकपणे माझ्या मातृभूमीची सेवा करण्यात सहकार्य केले. परंतु या संपूर्ण काळाच्या दरम्यान काँग्रेस संघटनेत मी विरून जाण्यापासून स्वतःस अलिप्त राखले आहे. जे लोक आपल्या शब्दाशी व कर्तृत्वाशी प्रामाणिक राहून अस्पृश्यांच्या कार्यात मदत करू इच्छितात त्यांच्याशी मी आनंदाने सहकार्य करून त्यांना मदत करीन. जे केवळ गोडबोले व गोड गोड थापा मारणारे आहेत परंतु ज्यांचा अंतस्थ हेतू आणि कृती आमच्या लोकांच्या हिताच्या विरोधी असते त्यांना मी कदापिही मदत करणार नाही.