२५० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
हक्क नागवण्यासाठी गांधीजींनी प्राणांतिक उपोषण आरंभिले. अस्पृश्यांच्या मनात ज्या राजकीय आकांक्षा निर्माण होऊ लागल्या होत्या त्यांना भिऊन गांधीजी अस्पृश्यांच्या विरुद्ध होते. आपल्या परोपकारी धन्यांच्या म्हणजे सवर्ण हिंदुंच्या दयेवर अस्पृश्यांनी अवलंबून राहावे असे त्यांना हवे होते. गांधीजींच्या शब्दावर विशवास ठेवून आणि हिंदू पुढाऱ्यांच्या आशवासनावर विसंबून गांधीजींचा जीव वाचविण्यासाठी आम्ही आपल्या हक्कांचा बळी दिला. याचा परिणाम आता तुमच्यासमोर असून प्रत्यक्ष दिसतच आहे. विशवासघाताची आणि कपटीपणाची ती एक दुःखद कथा आहे. सर्व प्रकारच्या भल्याबुऱ्या मार्गाचा अवलंब करून काँग्रेसने अस्पृश्यांना त्यांच्या न्याय हक्कांपासून नागविले आहे. ज्यांना अस्पृश्य समाजामध्ये मानाचे स्थान नाही असे लोक केवळ सवर्ण हिंदुंच्या पाठिंब्यामुळे कायदे मंडळावर निवडल्या जात आहेत. तथाकथित हरिजन हे काँग्रेसचे हस्तक आहेत. या हरिजन उमेदवारांना तिकीट देताना काँग्रेस त्यांना कोणता निकष लावते हे मला काही समजत नाही. साधारणतः कोणत्याही उमेदवाराला निवडणुकीसाठी तिकीट देताना त्याने देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात कारावास भोगला आहे काय, असे काँग्रेस विचारते. परंतु आश्चर्याची गोष्ट अशी की हरिजनांना तिकिटे देताना हा निकष काँग्रेस लावीत नाही. राखीव जागेवर हरिजन उभे करून अस्पृश्यांनी मिळविलेले हक्क कॉँग्रेस सहजपणे धुळीस मिळवीत आहे.
काँग्रेसच्या तिकिटावर पुष्कळसे अस्पृश्य कायदे मंडळात निवडून गेलेले आहेत. या हरिजन आमदारांना मी विचारू इच्छितो की मागील चार वर्षामध्ये त्यांनी त्यांच्या लोकांसाठी काय केले आहे. पार्लमेन्टमध्ये आणि घटनासमितीत ३० हरिजन होते. अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून नियुक्त केलेल्या या ३० सभासदांपैकी एकाने तरी भारताच्या राज्यघटनेवरील चर्चेत कधी भाग घेतला काय ? या हरिजन सभासदांपैकी कोणीतरी एखादा प्रश्न विचारला, एखादा ठराव मांडला किंवा एखादे बिल मांडले काय? या हरिजनांच्या चूप बसण्यावरून पार्लमेन्टच्या कामकाजाचा विदेशी समालोचक बरोबर हाच निष्कर्ष काढू शकतो की भारतात अस्पृश्यांचा कोणत्याही प्रकारे छळ होत नाही, त्यांची कोणत्याही प्रकारची तक्रार नाही. प्रामाणिकपणे बोलावयाचे तर सत्य याच्या विरूद्ध आहे. आमच्या दुःखाबद्दल निर्भयपणे कायदेमंडळात आवाज उठवतील असे प्रतिनिधी आम्हाला हवेत. परंतु काँग्रेसने नेमलेले हे अस्पृश्यांचे प्रतिनिधी आज्ञाधारकपणे त्यांच्या धन्याचे गुणगान तरी करतात किंवा अस्पृश्यांचे हक्क, मूलभूत गरजा नाकारल्याच्या, अस्पृश्यांचा उपमर्द व अवमानाच्या, पिळवणुकीच्या व अत्याचाराच्या घटना सर्व भारतभर प्रत्यही घडत असल्याच्या भयानक कथा ऐकू येत असल्या तरी आपली तोंडे बंद करून बसतात.