२७-१०-१९५१ मी नदीच्या प्रवाहालाच वळविणाऱ्या भक्कम खडकासारखा आहे - Page 291

मी नदीच्या . . . . खडकासारखा आहे २५१

अस्पृश्य लोकांच्या प्रश्‍नात पं. नेहरूंनी कधीही थोडीसुद्धा आस्था दाखविली नाही. गेली वीस वर्षे ते राजकारणाच्या आघाडीवर आहेत. त्यांनी दोन हजारापेक्षाही जास्त सभातून भाषणे दिली असावीत. अस्पृश्य लोकांवर जे अत्याचार होतात त्यांचा त्यांनी कधीतरी उल्लेख केला आहे काय ? माझ्या स्मरणानुसार कधीही नाही. त्यांना मुसलमानांचे वेड लागले आहे. त्या आजाराने ते दु:खी आहेत. मुसलमानांवर अन्याय झाला किंवा अन्याय झाल्याची कल्पना त्यांना आली तरी ते विचलित होतात. भारतातील मुसलमानांचे संरक्षण करण्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करतील. मुसलमानांना संरक्षण देण्याच्या मी विरुद्ध नाही. माझे असे मत आहे की मुसलमानांनी पाकिस्तानात जावे. लोकसंख्येच्या अदलाबदलीचा योग्य मार्ग सापडू शकत नसेल तर भारतातील मुसलमानांचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्यच आहे. परंतु मुसलमान अल्पसंख्य असले तरी अस्पृश्यांशी तुलना करता ते त्यांच्या संरक्षणासाठी अधिक उत्तम स्थितीत आहेत. अस्पृश्य, आदिवासी, गुन्हेगार जमाती, हे नावही किळसवाणे आहे. मागासजाती किंवा खिश्चन लोक. यासारख्या अन्य अल्पसंख्य लोकांनाही संरक्षण देण्याचा किंवा त्यांच्या उत्थानासाठी काहीतरी भरीव करण्याचा विचार नेहरुंनी कधीतरी केला आहे काय ? जर काँग्रेसच्या लोकांना अस्पृश्यांबद्दल प्रेम किंवा सहानुभूती नाही तर काँग्रेसच्या लोकांवर अस्पृश्यांचा विशवास कसा बसू शकतो.

काँग्रेसने अस्पृश्यांसाठी खूप काही केले असे जगाला सांगताना पं. नेहरू कधी थकत नाहीत. ते म्हणतात ते कसे खोटे आहे हे दर्शविण्यासाठी मी फक्त एकच

उदाहरण देतो.

विभाजनानंतर पाकिस्तान सरकारने अस्पृश्यांना पाकिस्तानातून भारतात येण्यावर बंदी घालणारे एक फर्मान काढले. कितीही हिंदुनी पाकिस्तान सोडले तरी पाक सरकारने त्यांची पर्वा केली नाही; परंतु अस्पृश्यांनी पाकिस्तान सोडले तर मैला वाहण्याचे, सडका झाडण्याचे, मेलेली जनावरे उचलण्याचे तिरस्करणीय जातीचे घाणेरडे धंदे कोण करणार होते ? मी पं. नेहरुंना विनंती केली की या लोकांच्या स्थलांतर करण्यावर बंदी घालणारा हा आदेश काढून घेण्यासंबंधी काहीतरी कारवाई करा. परंतु त्यांनी काहीही केले नाही. या समस्येसंबंधी ते झोपी गेले आणि पाकिस्तानशी ज्या काही चर्चा वेळोवेळी झाल्या त्यावेळी त्यांनी या प्रश्‍नाचा प्रासंगिक उल्लेखही केला नाही. एकाकीपणे जेवढे मला करता येणे शक्य होते तेवढे मी केले आहे. महार बटालियनच्या शूर शिपायांनी गंभीर धोका पत्करून मला मदत केली आणि पाकिस्तानातून अनेक अस्पृश्य लोकांना आणले.