२५२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
अशा स्थितीत आम्ही काँग्रेस पुढाऱ्यांच्या आश्वासनावर विश्वास कसा ठेवावा. अस्पृश्य लोकासंबंधीचा काँग्रेसचा हेतू प्रांजळ असेल तर ते सर्वसाधारण जागेवर अस्पृश्य उमेदवार उभा करून आपला प्राजळपणा सिद्ध का करीत नाहीत ?
काँग्रेसशी लढा देणे शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनला कठीण जाईल असे आम्हास सांगण्यात येते. ही शुद्ध लोणकढी आहे. या निवडणुकीत आम्ही यशस्वीपणे बाहेर पडू याबद्दल मला मुळीच शंका नाही. काळ बदललेला आहे. मागच्या निवडणुकीच्या वेळी प्रत्येकजण आमच्या विरुद्ध होता आणि काँग्रेसनेच स्वातंत्र्य मिळवून देशाला स्वतंत्र केले, अशा प्रकारच्या काँग्रेसच्या प्रचारामुळे काँग्रेसवर विशवास ठेवून प्रत्येकजण तिच्या सोबत होता. आज काय स्थिती आहे ? पंजाब काँग्रेसकडे नुसती नजर फेका ! पंजाबमध्ये खरोखरच काँग्रेस अस्तित्वात आहे काय ? पंजाबातील काँग्रेस आधीच मेलेली दिसते. तिचे दोन आधारस्तंभ डॉ. गोपीचंद भार्गव आणि श्री. भीमसेन सच्चर हे भ्रेष्ठतेसाठी परस्पराशी लढत आहेत. उमेदवार निश्चित करण्याची तारीख अगदी हाताशी येऊन ठेपली असली तरीही येत्या निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी अजून काँग्रेसने संमत केलेली नाही. जे लोक ' आम्ही एका आईची लेकरे आहोत ' असे घराच्या गच्चीवरून जाहीर करीत होते तेच लोक आता कडव्या शत्रुप्रमाणे एकमेकाशी लढत आहेत. भार्गव गट आणि सच्चर गट या दोहोंमध्ये हार्दिक एकी होणे पूर्णतः असंभव आहे.
पंजाबचा मुख्यमंत्री कोण होणार हाच एकमेव प्रश्न या पुढाऱ्यांसमोर आहे. या सभ्य गृहस्थांना लोकांच्या गाऱ्हाण्यांशी काहीएक कर्तव्य नाही. पंजाबातील लढा हा कोणत्याही तत्त्वासाठी नाही तर तो लढा सत्तेसाठी आहे. हीच स्थिती बिहार आणि अन्य अनेक राज्यात आहे. लाचलुचपत, भ्रष्टाचार आणि भाई-भतिजा वादाबद्दल अनेक काँग्रेस उमेदवारांच्या विरूद्ध अनेक तक्रारी काँग्रेसच्या ऑफिसात प्रत्यही येत आहेत. १९४७ मध्ये काँग्रेस तिच्या कीर्तीच्या कळसावर होती. आता, केवळ चार वर्षाच्या काळानंतर, ती अगदी खालच्या पातळीपर्यंत घसरली आहे. जगातील राजकीय पक्षांच्या इतिहासातील हे असे अद्वितीय उदाहरण होय. ' काँग्रेसवाला ' आणि ' सज्जन ' हे परस्परविरूद्ध अर्थाचे ठळकं वेगवेगळे आणि परस्पराशी कधी संबंधित नसणारे दोन शब्द होत.
अशा स्थितीत ' आपण ही लढाई हरू ' अशी भीती बाळगावयास नको. काँग्रेस-आपला पुर्वापार शत्रु-तिच्या जुन्या शक्तीपासून वंचित झाली आहे.