२५४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
आपणास जे काही करावयाचे आहे ते इतकेच की ते सुव्यवस्थित स्थितीत सांभाळावयाचे आहे. आतापासूनच आपण त्यासाठी जोमदार प्रयत्न केले नाही आणि जर समाधान मानून राहिलो तर अशी वेळ येऊन ठेपण्याची शक्यता आहे की बेघर होउन आपणास इकडे तिकडे भटकावे लागेल आणि सर्व प्रकारचा अपमान, अन्याय, अत्याचार सहन करावा लागेल व वेदकाळापासून ज्याची आपण शिकार झालो होतो अशाप्रकारचे पंगुत्व आपणास येईल.
आता तुम्हास सर्वांना माहित आहेच की शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनचे येत्या निवडणुकीत हत्ती हे चिन्ह आहे. हत्ती हे चिन्ह मी निवडले कारण भारतातील प्रत्येकालाच ते माहीत आहे. . निरक्षर लोकही ते सहजपणे ओळखू शकतात. याशिवाय हत्ती हा शहाणपणा, शक्ती आणि धैर्यासाठी प्रसिद्ध आहे. आपले लोक हत्तीप्रमाणे आहेत. त्याला पायावर उभे राहाण्यास वेळ लागतो परंतु एकदा तो आपल्या पायावर उभा झाला म्हणजे तुम्ही त्याला सहजगत्या गुडघे टेकावयास लावू शकत नाही.
आता निवडणूक समझोत्याविषयी सांगावयाचे म्हणजे शेड्यूल्ड कास्ट्सूचे लोक अल्पसंख्यांक आहेत. आपणाला स्वतंत्र मतदारसंघही प्राप्त झालेले नाहीत. म्हणून निवडणुकीपुरता आपणाला अन्य पक्षांशी मैत्री-करार करणे आवश्यक आहे. शेड्यूल्ड कास्ट्ससाठी राखीव असलेल्या मतदार संघात आपणाला प्रत्येकाला दोन मते आहेत. ज्या पक्षाशी आपण मैत्री करू त्या पक्षाला आपण एक मत देऊ शकतो. एक मत शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनच्या उमेदवाराला जाईल. निवडणुकीसाठी कोणत्या पक्षाशी समझोता करावा हे अजून ठरलेले नाही. लवकरच ते ठरविण्यात येईल. एकदा ते ठरल्यानंतर ज्या पक्षाशी आपण मैत्री-करार करू त्या पक्षाला आपले एक मत देणे हे शेड्यूल्ड कास्ट्सूच्या प्रत्येक मतदाराचे कर्तव्य आहे.
भाषण संपविण्यापूर्वी पंजाबातील प्रत्येक मतदाराला मी अशी विनंती करतो की त्याने फेडरेशनच्या उमेदवाराला मत द्यावे आणि आपल्या उन्नतीचा मार्ग मोकळा करावा.