२५६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
करण्यास ते समर्थ कसे बनले ? भारतात त्यांचे स्वतःचे सैन्य नव्हते. इंग्रजांच्या स्वतःच्या सैन्याशिवाय ते भारतातील सर्व राजामहाराजांना जिंकण्यास समर्थ कसे ठरले यांचे स्पष्टीकरण कोणीही करू शकला नाही. मी आता या प्रश्नाचे उत्तर देणार आहे. ज्यांना त्यांचेच देशवासीलोक ' अस्पृश्य ' म्हणून संबोधित होते अशा शेड्यूल्ड कास्ट्सूच्या लोकांच्या मदतीने ब्रिटिश लोक भारताचे राज्यकर्ते बनले. हे अस्पृश्य लोक निरक्षर होते आणि सवर्ण हिंदुंनी त्यांना दिलेली वागणूक मानहानीकारक होती. त्यांना चरितार्थाचे कोणतेही साधन नव्हते आणि त्यांना नेहमी सवर्ण हिंदुंच्या दयेवर अवलंबून राहावे लागत असे. जे काही घडले ते योग्य होते हे तुमच्या मनावर बिंबवावे असा माझा हेतू नाही. परंतु दुसऱ्या एका मुद्यावर मला जोर द्यावयाचा आहे. मला हे दाखवून द्यावयाचे आहे की ज्या लोकांना भारतात राज्य स्थापण्यासाठी मदत केली त्यांनीसुद्धा आमच्या लोकांना अशा निकृष्टपणे वागविले. ह्या ब्रिटिशांसाठी आमच्या लोकांनी लढाईत आपले प्राण गमावले; परंतु त्यांना मोबदल्यात काय मिळाले ? लाभ कुणाला झाला ? ब्रिटिशांना शेड्यूल्ड कास्ट्सूच्या लोकांनी मदत केलेली असताही त्यापासून ब्राह्मण आणि अन्य सवर्ण हिंदुनी पूर्ण लाभ उपटले. ब्रिटिशांनी त्यांच्याच मुलांना शिकविले आणि सर्वप्रकारची आर्थिक मदत त्यांनाच दिली व आमच्या लोकांकडे मुळीच लक्ष देण्यात आले नाही. याचा परिणाम असा झाला की, गरीब बिचाऱ्या शेड्यूल्ड कास्ट्सूच्या लोकांच्या जीवावर सवर्ण हिंदू संपन्न झाले आणि अस्पृश्य लोक जसेच्या तसेच राहिले. आजपर्यंत शेड्यूल्ड कास्ट्सूचे कुटुंब सुसंपन्न का नाहीत, त्यांची मुले शिक्षित का नाहीत आणि ते मागासलेले का आहेत याचे हेच कारण होय. परिणामतः सैन्यातील, पोलीस दलातील आणि प्रशासकीय खात्यातील महत्त्वाची पदे सध्या सवर्ण हिंदुंच्याच हातात आहेत. ब्रिटिश लोकांनी आमच्या उन्नतीसाठी काहीतरी करावयास पाहिजे होते परंतु त्यांनी आमच्यासाठी काहीही केले नाही. १८५८ मध्ये बंड झाले. त्या बंडाची कारणे काय होती ? कारण आमच्या लोकांसाठी काहीतरी करण्यास ब्रिटिश लोक चुकले; सैन्यातील आमच्या लोकांना त्यांच्याविरुद्ध बंड करणे भाग पडले. जेव्हा हे बंड आटोक्यात आले आणि असे दिसून आले की सैन्यातील आमच्या लोकांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध बंड पुकारले होते तेव्हा त्यांनी त्यापुढे आमच्या लोकांची सैन्यामध्ये भरती करणे बंद केले. त्यांच्याऐवजी हिंदू आणि राजपूतांची सैन्यात भरती करण्यात आली. अशाप्रकारे आपल्या लोकांचे उत्पन्नाचे मुख्य साधन नष्ट झाले. १९४७ साली जेव्हा इंग्रजांनी भारत सोडला तेव्हा इंग्रज लोक भारतात येण्यापूर्वी अस्पृश्य ज्या स्थितीत होते त्याच शोचनीय स्थितीत होते. राज्यसत्तेचे हस्तांतरण करतेवेळी इंग्रजांनी सर्व सत्ता सवर्ण हिंदुंच्या हाती सोपविली.