२६० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
तर आपला सर्वनाश होईल. आजपर्यंत जो जुलूम तुम्ही सोशीत आहात तो तुमच्या भावी पिढ्यांना सोसावा लागू नये अशी तुमची इच्छा असेल तर तुम्हाला आताच त्यासाठी काहीतरी केले पाहिजे. जेव्हा तुम्ही झाड लावता तेव्हा काही काळानंतर तुम्हाला फळे प्राप्त होतात. मी तुमच्या मनावर हे बिंबवू इच्छितो की, विधानसभा आणि संसदेतील राखीव जागा फक्त दहा वर्षासाठी आहेत. भारतात अस्पृश्यता प्रचलित असेपर्यंत त्या राहाव्यात असे मला वाटत असले तरी काँग्रेसच्या तिकिटावर जे आपले लोक संसदेचे सभासद झाले त्यांनीच मला विरोध केला. अशा स्थितीत उच्चवर्णीय लोकांबद्दल बोलावयासच नको. काहीच नसण्यापेक्षा थोडे जरी मिळत असेल तर बरे असा विचार करून दहा वर्षेपर्यंत राखीव जागा असाव्यात याला मी संमती दिली आणि आमच्या लोकांसाठी थोडे फार मिळविले. या राखीव जागा फक्त येत्या दोन निवडणुकीपुरत्याच आहेत आणि त्या काळापर्यंतच काँग्रेससारखे हितसंबंधी पक्ष तुमच्याकडे येतील व मते मागतील. अशातऱ्हेने हा १० वर्षाचा कालावधी निघून जाईल आणि या काळात वाढ करा अशी मागणी करण्यासाठी तुमचा कोणीही माणूस तेव्हा संसदेत असणार नाही. तेव्हा तुम्ही काय करणार आहात असे मी तुम्हास विचारु इच्छितो. तेव्हा हे काँग्रेसवाले तुमच्याकडे येऊन त्यांच्या तिकिटावर निवडणुकीसाठी उभे राहाण्याची विनंती करतील काय ? निश्चितच नाही. ते इतके मूर्ख नाहीत. तुम्हा लोकांना ते मूर्ख बनवू इच्छितात. आज जे लोक काँग्रेसचे तिकिट मिळविण्याच्या प्रयत्नात असलेले दिसतात, त्यांच्या तोंडावरही तेव्हा हे काँग्रेसवाले थुंकणार नाहीत. म्हणून तुम्ही सर्वानी या समस्येवर विचार करावा आणि नंतरच तुम्ही कोणत्या उमेदवाराला मत द्यावे ते ठरवा.
कोणत्याही पक्षाजवळ सत्ता तरी असली पाहिजे किंवा पैसा तरी असला पाहिजे. आपल्या समाजाजवळ पैसाही नाही आणि सत्ताही नाही. आपणया उच्चवर्णीय हिंदुंच्या दयेवर खेड्यांमधून थोड्या थोड्या संख्येने राहात आहोत. बनिया आणि मारवाडी इत्यादी लोकही सत्ताधिष्ठित नाहीत. परंतु त्यांच्याजवळ पैसा आहे. पैशाच्या जोरावर ते वाटेल ते विकत घेऊ शकतात. म्हणून तुमच्या स्वतःसाठी काहीतरी करण्याची ही एक सुसंधी आहे. तुम्ही जर संघटित झालात तर तुमच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी तुम्ही तुमचे प्रतिनिधी विधानसभा आणि संसदेत पाठवू शकता; नाहीतर तुमचा नाश होईल. म्हणून या गोंधळातून तुमच्या समाजाला बाहेर काढण्यासाठी शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनच्या ध्वजाखाली तुम्ही संघटित झाले पाहिजे. आपले सच्चे प्रतिनिधी निवडण्याकरिता प्रत्येक अस्पृश्याने फेडरेशनला मदत करावी. पुष्कळ पक्ष तुमच्याकडे येऊन मताची मागणी करतील परंतु त्यांचे ऐकून चुकीच्या मार्गाने जाऊ नका.