२६२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
समस्यांशी तोंड द्यावे लागते त्यांचा जाहीरनाम्यात विचार असला पाहिजे आणि त्या समस्या कशा सोडवाव्या हेही असले पाहिजे. कॉँग्रेसच्या जाहीरनाम्यात अशा प्रकारचे काहीतरी आहे काय ? काँग्रेसच्या जाहीरनाम्यात फक्त एकाच गोष्टीवर भर देण्यात आला आहे, ती गोष्ट म्हणजे मुस्लिम समस्या. कोणीतरी या मुद्यावर सहमत होऊ शकतो काय ? भारत अभंग असताना आणि जेव्हा पाकिस्तान नव्हते तेव्हा अर्थात मुस्लिम समस्या होती. परंतु तेव्हासुद्धा देशासमोर असलेली ही एकमेव समस्या नव्हती, मुस्लिमांनी फार मोठ्या संख्येत पाकिस्तानात स्थलांतर केले असून फक्त हिंदू, शिख आणि अन्य अल्पसंख्य लोक भारतात आहेत. भारत आता मुस्लिम-समस्येला तोंड देत आहे असे तुम्हास वाटते काय ? मुसलमानांपेक्षा जे दसपट गरीब आणि मागासलेले आहेत अशा दलित लोकांसाठी काहीही करावयास नको हे तुम्हास मान्य आहे काय ? अनुसूचित जाती, आदिवासी आणि गुन्हेगार जमाती यांच्याकडे सरकारने सर्वात जास्त लक्ष द्यावयास पाहिजे परंतु काँग्रेसवाले सांगतात की लोकांनी जातीयवादी होऊ नये ` आणि मागास जातीकरिता काही खास तरतुदीची मागणी करू नये. भारतातील दुसरी समस्या दारिद्र्याची आहे. भारतातील लोक अत्यंत दरिद्री आहेत. ते इतके दरिद्री आहेत की ९० टक्के लोकांना खावयास योग्य अन्नही मिळत नाही, त्यांना कपडे मिळत नाहीत, त्यांना निवारा नाही. कोट्यावधी रुपयांचे अन्नधान्य दरवर्षी परदेशातून आयात केले जाते. आम्हाला जर अन्नधान्यही परदेशातून आयात करावे लागते आणि त्याच्या खरेदीवर व आयातीवर एवढी मोठी रक्कम खर्च करावी लागते तर आमचा निभाव कसा लागेल? परंतु या सर्व गोष्टींकरिता काँग्रेसवाल्यांच्या मनात काहीच स्थान नाही. त्यांच्यासमोर एकच प्रश्न आहे आणि तो म्हणजे मुस्लिम समस्या !
मला तुम्हास सांगावयाचे आहे की, येत्या निवडणुकीत आम्ही शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनचे उमेदवार उभे करीत आहोत. शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशन
हा सर्व मागासवर्गीय लोकांचा प्रातिनिधीक पक्ष आहे. प्रत्येक मागासवर्गीयाला त्यात प्रतिनिधीत्व देण्यात येईल. त्याची कोणीही भीती बाळगू नये. चांभार आणि भंगी हे सर्व समसमान आहेत. आपण एका जमातीचे एक लोक आहोत. आपण आपसात भांडू नये. मी सर्व पुरुष आणि स्त्रियांना विनंती करू इच्छितो की मतदानाच्या दिवशी सर्व कामे बाजूला सारून मतदान केन्द्रावर जाऊन मतदान करावे. आधीच आपली मते पुरेसी नाहीत आणि त्या दिवशी जर त्यांनी मतदान केले नाही तर ते आपल्या भल्याचे होणार नाही. आपण प्रतिनिधीत्वाशिवाय राहू. मतदानाचा दिवस अनुसूचित जातीच्या लोकांसाठी जीवन-मरणाचा दिवस आहे.