२९-१०-१९५१ देशाच्या अपत्तीसाठी प्रसंगी आम्ही आघाडीवर राहू - Page 305

२८२
देशाच्या आपत्तीच्या प्रसंगी
आम्ही आघाडीवर राहू

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पंजाबात ऑक्टोबर महिन्याचे अखेरीस धावता दौरा काढला तेव्हा पतियाळात त्यांचे दिनांक २९ ऑक्टोबर १९५१ रोजी जंगी स्वागत झाले. त्यावेळी श्री. बापूसाहेब राजभोज शिवाय शेठ किसनदास, श्री. सुलेख, श्री. मिहानसिंग हे पंजाब मधील दलित फेडरेशनचे प्रमुख पुढारी हजर होते. बाबासाहेब आपल्या भाषणात म्हणाले,

भगिनींनो आणि बंधुंनो,

माझी तब्येत ठीक नाही हे श्री. राजभोज यांनी आपणास सांगितलेच आहे. मी -थोडक्यात माझ्या पक्षाची भूमिका स्पष्ट करतो आणि कोणत्या गोष्टींना या राजकारणाच्या आखाड्यात उतरले असताना कसे तोंड दिले पाहिजे ते सांगतो.

अस्पृश्यांवर अत्याचार करण्याच्या व त्यांच्या महत्त्वाकांक्षेला खो घालण्याच्या प्रथेस काँग्रेस व सवर्ण हिंदुंनी वेळीच आळा घातला नाही तर आम्हास त्यांचा बिमोड करण्यासाठी वेगळाच मार्ग अवलंबिणे भाग पडेल [. ] काँग्रेसने आपले धोरण वेळीच बदलले पाहिजे. अस्पृश्यांना पोषक असेच ते असले पाहिजे.

ही निवडणुकीची वेळ आहे. यातच देशातील सारे पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते गुंतले आहेत. निवडणूक ही महत्त्वाची गोष्ट आहे यात शंका नाही. निदान आम्हाला तरी येती निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची म्हणजे जीवन मरणाची बाब वाटते. यासाठी या प्रश्‍नाचा संपूर्ण खल होणे व त्यावर योग्य तो तोडगा काढणे अत्यंत आवश्यक आहे.

काँग्रेस हा मोठ्यात मोठा राजकीय पक्ष आहे. हा पक्ष आज साठ वर्ष टिकून आहे. शिवाय आज तो अधिकारारूढ झालेला आहे. चार वर्षे या पक्षाने राज्योपभोग घेतला आहे. लोकांना या पक्षाकडून दिमाखाने असे सांगण्यात येते की काँग्रेस शिवाय लोकांचे व देशाचे कुणी भले करू शकणार नाही, त्यासाठी काँग्रेसलाच मतदान केले पाहिजे. काँग्रेसला अधिकार योग परत हवा आहे. यासाठी गरीब लोकांना पिळून खाणाऱ्या काँग्रेसला या लोकांनी निवडून दिले पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे. काँग्रेसकडे भाडोत्री प्रचारक पुष्कळ आहेत व या पक्षाकडे चिक्कार पैसा असल्यामुळे ते पोसले जातात. त्यामुळे काँग्रेस लोकांवर वजन आणू शकते.

जनता : ३ नोव्हेंबर १९५१.