२६६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
यासाठी काँग्रेसमध्ये खरा प्रकार काय आहे याचा शोध लावला पाहिजे. एकतर्फी प्रचारामुळे कुणाची दिशाभूल होता कामा नये. अन्न-धान्य व कपड्याचा प्रश्न काँग्रेस सोडवू शकली नाही हे आपणा सर्वांस माहित आहे. उलट ती एक बिकट बाब होऊन बसली आहे.
निर्वासितांचे प्रश्न सुद्धा अधिकारारूढ असलेली काँग्रेस सोडवू शकली नाही. मग ही काँग्रेस परत अधिकारारूढ झाली तर हे निकडीचे प्रश्न कसे सोडवील ? आपली नालायकी तर चार वर्षाच्या राज्यकारभारात सिद्ध करून दाखविली आहे. थोडक्या वेळात एवढे महत्त्वाचे प्रश्न सोडविणे अशक्य होते अशी सबब काँग्रेस सांगेल. तरी पण काँग्रेसच्या मध्यवर्ती व प्रांतिक सरकारांवर हुकूमत गाजविणाऱ्या काँग्रेस हायकमांडने निदान देशाला वशिलेबाजी, लाचलुचपत, नैतिक ऱ्हास या तीन महान रोगांपासून मुक्त केले पाहिजे होते. काँग्रेसच्या मनात असते तर ती या गोष्टीचा नायनाट करू शकली असती. पण ह्या विषाचा अंमल काँग्रेस राजकारणात इतका भिनला आहे की त्याचे निर्मूलन होणे शक्य नाही, शिवाय लहानांपासून थोरांपर्यंत सारे एकाच माळेचे मणी बनले आहेत.
काँग्रेस मंत्रिमंडळाकडून आपले काही कामकाज करून घ्यावयाचे असेल तर लाच ही लावलीच पाहिजे नाहीतर अशांचा अर्ज फेटाळला गेला म्हणून समजा. हे आरोप मी करीत नाही. खुद्द काँग्रेसच्या गोटातून केले जातात व वशिलेबाजी, लाचलुचपत आणि काळाबाजारातील काही भाग काँग्रेस मंत्रिमंडळ घेते असे उघड बोलले जाते.
मद्रासचे प्रमुख मंत्री श्री. टी. प्रकाशन यांना काँग्रेसमधील असल्याच अंतर्गत भानगडीमुळे राजीनामा देणे भाग पडले. राजीनामा दिल्यावर त्यांनी काँग्रेस हायकमांडपुढे मद्रासमधील सहकारी मंत्र्यांवर गंभीर आरोप ठेवले. त्यात स्पष्ट म्हटले होते की, काही मंत्र्यांनी नियंत्रणांचा फायदा घेऊन स्वतःची झोळी भरली. शिवाय सरकारी पैशाचा स्वतःच्या खाजगी कामाकरता उपयोग केला गेला. काहींनी आपल्या नातेवाईकांना सरकारी कामे दिली. उत्तर प्रदेशात सुद्धा असाच प्रकार झाला. एककाळ प्रांतिक कॉंग्रेसचे अध्यक्ष श्री. त्रिलोकसिंग व आता यु. पी. असेंब्लीमधील विरुद्ध गटाचे पुढारी यांनी पण काँग्रेस मंत्र्याविरुद्ध असेच आरोप केले होते. पंजाबमध्ये दोन माजी प्रमुख मंत्री एकमेकांवर वशिलेबाजीचा, अनितीचा उघड आरोप करीत आहेत.
वास्तविक काँग्रेस हायकमांडने एक चौकशी कमिशन नेमून या आरोपांची कसून चौकशी केली पाहिजे व गुन्हेगारांना शासन केले पाहिजे. अशी चौकशी केल्याशिवाय चांगले सरकार अस्तित्वात आहे असे म्हणता येत नाही कारण खुद्द