२९-१०-१९५१ देशाच्या अपत्तीसाठी प्रसंगी आम्ही आघाडीवर राहू - Page 308

२६८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

अशी काही माणसे व विशिष्ट गट आहेत की ज्यांचे कार्य परस्पर विरोधी आहे. शेतकऱ्यांना पिळणारे बनिया आणि शेतकरी हे शांततेने एकत्र नांदतील का ? तशीच स्थिती ब्राह्मण व अस्पृश्यांची आहे. ब्राह्मण वर्ग अस्पृश्यांना नेहमीच डांबून ठेवणार. तो त्यांना कधीच वर येऊ देणार नाही.

अस्पृश्यांना साधे माणुसकीचे जीवन ब्राह्मणवर्ग जगू देत नाही. मग असा पक्ष की, ज्यात अत्याचार करणारे व अत्याचार ज्यांचेवर होतो ते, तसेच लोकांना पिळून खाणारे व जे लोक अशा खाईत पडतात ते या परस्पर विरूद्ध लोकांचा | एक पक्ष कसा होऊ शकेल ? ज्या पक्षात अत्याचारी व स्वार्थी लोकांचे प्रतिष्ठित स्थान आहे अशा पक्षाकडून गरीब व अत्याचाराने पिडलेल्या लोकांचे कल्याण काय होणार, कपाळ ।

म्हणून अशा अत्याचारापासून गांजलेल्या लोकांची एक प्रचंड विरोधी संघटना असणे ही एक महत्त्वाची बाब आहे. नाहीतर लोकांच्या सुखाच्या साऱ्या आशांचे हे अधिक निर्मूलन करतील. काँग्रेसच्या सापळ्यात, त्यांच्या गोड हुलकावणीने पडू नका. स्वतःच्या पायावर धोंडा घालून घेतल्याचा तुम्हाला पश्चाताप होईल. अशा पक्षात सामील होणे म्हणजे परंपरेने चालत आलेल्या अत्याचारांना आपण होऊन बळी देणे होय.

अशाने देशाला मिळालेले स्वातंत्र्य फक्त सवर्णीय हिंदूच उपभोगतील. जर स्वातंत्र्याचा उपयोग आपणास हवा असेल, जर आपणास आपली भरीव संघटना करावयाची असेल तर दलित फेडरेशन मजबूत करणे हा एकच मार्ग आहे.

काँग्रेसच्या हरिजन मंत्र्यांनी आजच्या सभेला हजर राहू नका असा लोकात जातीने प्रचार केला होता. जर आमच्या फेडरेशनने अस्पृश्यांच्या हितासाठी लढा दिला नसता तर आज हे हरिजन मंत्री कुठे असते ? यांना मंत्री कुणी केले ? मी केले असे स्पष्ट सांगतो. फेडरेशनने मंत्री केले असे ठासून सांगतो. फेडरेशनने लढा दिला नसता तर आज या हरिजन मंत्र्यांना लाजिरवाण्या जिण्याने जगावे लागले असते. या हरिजन मंत्र्यांनी कधी अत्याचार झालेल्या आपल्या आई बहिणींच्या डोळ्यांतील कारुण्यपूर्ण अश्रू पुसले आहेत का? त्यांच्या गरजांकडे कधी आस्थापूर्वक लक्ष पुरविले आहे काय ? त्यांना माणुसकीचे जीवन जगता यावे म्हणून धडपड केली आहे का? या काँग्रेसधाजिण्या मंत्र्यांनी फक्त स्वतःचा स्वार्थ साधला, म्हणून राज्यकारभार हाकण्यात आम्हाला आमचीच माणसे हवीत की, जी आपल्या बांधवांवर झालेल्या अत्याचाराचा जाब विचारून त्यांच्या जीवनात सौख्य आणतील व आपले हक्क प्राणाचे बलिदान करून सुद्धा मिळवतील अशाच माणसांना निवडून देणे रास्त आहे. अशा माणसांना लोकसभेत व प्रांतिक राज्यातील असेंब्लीत निवडून दिले पाहिजे की जे स्वत:ची बुद्धी गहाण ठेवून वागणार नाहीत. अस्पृश्यांच्या