२९-१०-१९५१ देशाच्या अपत्तीसाठी प्रसंगी आम्ही आघाडीवर राहू - Page 310

२७० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे :

आमच्या राजकीय हक्कांची अंमलबजावणी सवर्ण हिंदुंना आम्ही मिळविलेल्या

म्हणून सुचवतो. पण काँग्रेस आमच्या करू देण्यास अडथळा करू नका

जमातीतील निमकहराम माणसांना वाव देते व भेद करायला सांगते, हे निवडणुकीचे तिकीट पदरात पाडू पहाणारे स्वार्थी व ढोंगी लोक आहेत. प्रथम ते काँग्रेसकडे जातात. तेथून कंबरेत लाथ बसली की फेडरेशनकडे निवडणुकीच्या तिकीटांची भीक मागायला येतात ! अशामुळे काँग्रेसला आम्ही मिळविलेल्या हक्कांची पायमल्ली करावयाची आहे. म्हणून आताच सावध राहिले पाहिजे व दमदार लढा दिला पाहिजे. निवडणुकीत आमचेच उमेदवार आम्ही निवडून दिले पाहिजेत. यात आम्ही अपयशी ठरलो तर आमचा सत्यानाश झाला असे समजा.

अस्पृश्यांसाठी ज्या राखीव जागा आहेत, त्या फक्त दहा वर्षांसाठी आम्ही मिळवू शकलो. जर एवढ्या काळात आम्ही आमची प्रचंड संघटना करू शकलो नाही तर आमचा घात ठरलेलाच म्हणून समजा. आज वेगवेगळ्या पक्षातील सवर्णीय हिंदू तुम्हाला निवडणुकीच्या तिकीटांचे आमिष दाखवून आपला पक्ष मजबूत करीत आहेत.

पण या दहा वर्षांच्या काळानंतर ते तुमच्याकडे ढुंकून पण पाहणार नाहीत, याची सावधगिरी आता बाळगली पाहिजे व उद्यासाठी आज आपल्या इमारतीचा पाया मजबूत घातला पाहिजे. तुमचाच प्रतिनिधी तुमच्या हक्कांसाठी लोकसभेत झगडू शकेल व तो प्राण गेला तरी मागे हटणार नाही.

आपण अल्पसंख्यांक आहोत ही पण गोष्ट ध्यानात असू द्या. आपली मतदानाची संख्या पण कमी आहे. प्रत्येकाने मतदान करणे ही गोष्ट महत्त्वाची आहे. मतदानाचा हक्क, निवडणुकीच्या दिवशी साऱ्या स्त्री-पुरुषांनी, आपले कितीही महत्त्वाचे काम असले तरी ते बाजूस सोडून बजावले पाहिजे.

जर आम्ही आमच्या तत्त्वाशी सहमत असणाऱ्या पक्षांशी हातमिळवणी केली तर निवडणुकीत आम्हास दुप्पट यश मिळेल. पण अजून अशा कोणत्या पक्षाला सहाय्य करायचे ते निश्‍चित झालेले नाही. पण जेव्हा असे निश्‍चित झाले की, त्या पक्षाच्या उमेदवारांनाही मतदान देणे आपणा साऱ्यांचे कर्तव्य ठरेल.

यंदा बरेचसे यश आपल्या पदरात पडेल असे खात्रीने वाटते. काँग्रेसची मजबुती आता ढासळली आहे. पंजाबमध्ये दोन काँग्रेस गटात लाथाळी सुरू आहे. त्यांच्यात ऐक्य होणे अशक्य आहे. आम्ही काँग्रेसला डरता कामा नये.

म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की, देशात फेडरेशनने उभ्या केलेल्या मतदारांनाच आपली मते द्या. जर आम्ही या लढ्यात यशस्वी झालो तर अनेक भरीव सुधारणा घडवून आणू व आमच्या हक्काआड येणाऱ्या गोष्टींना मूठमाती देऊ.