१७-११-१९५१ सत्तेवर कोणत्याही पक्षाला जनतेच्या सर्वागीण हितासाठी जोतीबा फुल्यांचे धोरण आणि लोकशाहीवादी तत्त्वज्ञान घेऊनच पुढे जावे लागेल - Page 318

२७८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

आजच येथील ' गावकरी'त मी एक महान संकटकारक अशी बातमी वाचली. नेपाळमध्ये कम्युनिस्ट सेना शिरकाव करून घेण्यासाठी ज्या संधीची वाट पाहात होत्या तशी संधी नेपाळमधील अंतर्गत परिस्थितीमुळे त्यांना मिळत आहे अशी ती बातमी आहे. आज भारताच्या सरहद्दीवर कम्युनिस्ट सेना सज्ज होऊन येऊन ठेपली आहे. ही सेना आपल्या देशात केव्हा घुसेल ह्याचा नेम नाही. ही भीती आज दिसत आहे. एवढेच नव्हे तर एक वर्षापूर्वी मी ही धोक्याची सूचना पंडित नेहरूंना दिली होती. त्यावेळेस माझे कोणी ऐकले नाही

आज दुर्दैवाने माझी भीती खरी ठरू पाहत आहे

आपणास आपल्या देशाचे स्वातंत्र्य टिकविले पाहिजे. स्वातंत्र्य टिकवून आपणास आपला देश समृद्ध राखावयाचा आहे. कम्युनिझमला ह्या देशात थारा दिला तर आपले स्वातंत्र्य रसातळास जाईल. आपला देश रशियाचा अंकित होऊन राहील. पूर्व युरोपातील राष्ट्रांचा अनुभव आपणास हेच सांगत आहे. आज आपल्या देशापुढे जे मोठे मोठे महत्त्वाचे प्रश्‍न आहेत ते आपले स्वातंत्र्य गमावून आपण सोडवू शकणार नाही. देशाच्या स्वातंत्र्याची राखरांगोळी कम्युनिझममुळे होणार हे आपण दृष्टीआड करू शकत नाही.

कम्युनिझमखेरीज दुसरे मार्ग आहेत आणि ह्या दुसऱ्या मार्गाने जाऊन आपण आपल्या देशाचे स्वातंत्र्यही टिकवू आणि पददलित, पिडीत अशा जनतेस सुखी-समृद्ध बनवू असा मला विशवास आहे. हा लोकशाहीचा मार्ग अपुरा आणि अयशस्वी ठरला तरच आम्ही कम्युनिझमचा विचार करू.

आज कम्युनिझमशी सोयरिक करणाऱ्या, कम्युनिझमच्या मार्गावर पावले

टाकणाऱ्यांना आणि त्यांच्या अनुयायांना मला हे विचारावयाचे आहे की ह्या देशात कम्युनिस्ट राजवट आली तर काय होईल ह्याचा त्यांनी विचार केला आहे काय ? शेतकरी कामगार पक्षामागे सारा मराठा समाज आहे असे आपणास सांगण्यात येते आणि म्हणूनच मला हे विचारावेसे वाटते. कम्युनिझम म्हणजे प्रथम सर्व संपत्ती सरकारच्या मालकीची करणे होय. सारे उद्योगधंदेच नव्हे तर सारी शेती, जमीन, घरे सर्व काही सरकारच्या मालकीची होतील आणि हे सर्व हुकूमशाही राजवटीखाली पार पाडण्यात येईल. शेतकरी कामगार पक्षाच्या मागे असलेल्या मराठा समाजास हे पसंत आहे का ? त्यांची जमीन, त्यांची शेती, त्यांचे मळे, त्यांची घरेदारे सरकारच्या मालकीची झालेली त्यांना चालतील का हा माझा प्रश्‍न आहे. |