२८६
एकांगी राजकारण कधीही यशस्वी
होऊ शकत नाही
महा. मुंबई दलित फेडरेशनच्या जनरल सेक्रेटरीने खालील पत्रक काढले
होते.
'“ महा. मुंबई दलित फेडरशन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना २५,००० रुपयांचा निवडणूक निधी अर्पण करणार !
दलित बंधु भगिनींनो, सढळ हाताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवडणूक निधीस हातभार लावा ! आजच्या १० तारखेच्या पगारातील आपला हिस्सा तुमच्या वार्ड कमिटीत जमा करा !! अगर द. फे. च्या परळ येथील ऑफिसात आणून भरा नि शासनकर्ती जमात बना !!!
आगामी निवडणूक ही आपल्या जीवन मरणाच्या प्रश्नावर आधारलेली आहे. हिंदुस्थान स्वतंत्र होवून ५ वर्षे झाली पण दलित जनतेच्या जीवनात, त्यांच्या राहाणीत, त्यांच्या दुःखात कसल्याही तर्हेचा फरक झालेला नाही. उलट या स्वातंत्र्याच्या काळात दलित जनतेचे अनन्वीत हाल झाले. स्पृश्य गुंडांनी खेडोपाडी धुमाकूळ घातला. खेड्यापाड्यातून अस्पृश्य
- वस्त्यांवर दिवसा ढवळ्या हल्ले केले. घरांना आगी लावण्यात आल्या. पिण्याच्या पाण्यात विष्टा, घाण टाकण्यात आली. सरकारी दरबारी कोणी दाद घेईना. एवढेच नव्हे तर काही ठिकाणी आमच्या पुढाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे सपशेल मुडदे पाडण्यात आले.
या साऱ्या जोर जुलूमांचा, अन्यायाचा व दु:खाचा आवाज या देशातील कोठल्याही कायदे मंडळात उठला नाही हे लक्षात घ्या! नि या कराल काळाच्या दाढेतून आपली सुटका करून घ्यायची असेल, उद्याच्या निवडणुकीत तुमच्या हाडामासाची, रात्रंदिवस तुमच्या हाकेस “ ओं ”' देणारी, तुमच्या खांद्यास खांदा देवून लढणारी ; आपली जीवाभावाची माणसे निवडून द्यायला नको काय ? व: ती निवडून आणावयाची झाल्यास त्यास द्रव्यबळ ही व्यवहारी जोड आपण द्यायला पाहिजे. म्हणून निवडणूक निधीत सढळ हाताने भर घाला.
जनता : १० आणि २४ नोव्हेंबर १९५१.