२२-११-१९५१ एकांगी राजकारण कधीही यशस्वी होऊ शकत नाही - Page 322

२८२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

भाषण ऐकण्यासाठी दुपारी तीन वाजल्यापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे

लोटत होता. ही सभा निवडणुकीच्या मदतीसाठी तिकीट लावून भरविण्यात आली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सौ. माईसाहेब समवेत बरोबर साडेसहा वाजता मैदानावर हजर झाले तेव्हा समता सैनिक दलाने सलामी दिली. हजारो लोक शेवटी तिकीटाशिवाय आत घुसले.

श्री. आर. व्ही. खरात, उपाध्यक्ष, मुंबई दलित फेडरेशन, यांनी प्रास्ताविक भाषण केले व डॉ. बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली फेडरेशनचा झेंडा उंचच उंच राहील म्हणून सांगितले. श्री. भातनकर यांनी डॉ. बाबासाहेबांना निवडणुकीसाठी जमलेली रकमेची थैली फेडरेशनतर्फे अर्पण केली. सौ. माईसाहेबांच्या हस्ते समता सैनिक दलाच्या खेळात यश मिळविलेल्या सभासदांना कप व मेडल्स देण्यात आली.

सभास्थानी प्रि. दोंदे, श्री. चित्रे, श्री. भाऊराव गायकवाड, कु. शांतादेवी दाणी, श्री. बोराळे, दलित फेडरेशनच्या वार्ड कमिटीचे अध्यक्ष व इतर कार्यकर्ते हजर होते. जवळ जवळ तीस हजारांच्या स्त्री-पुरूषांच्या समुदायाने मैदान फुलले होते. मैदानाबाहेरपण शेकडो लोक होते. अनेक वृत्तपत्रांचे प्रतिनिधी खास बाबासाहेबांचे स्फुर्तिदायक भाषण ऐकण्यास हजर होते. ते आपल्या भाषणात

म्हणाले,

भगिनींनो आणि बंधुनो,

आज ही सभा एकाप्रकारे एकांगी आहे, असे म्हणायला हरकत नाही. हीसभा

फक्त अस्पृश्यांची आहे. ही सभा एकांगी असल्याकारणाने मी एकांगी भाषण करणार आहे. सर्वसाधारण इलेक्शन मिटींगमध्ये जिथे मोठा समुदाय असतो तिथे एकांगी भाषण करणे अनुचित असते.

गेली चार वर्ष मी काँग्रेस सरकारात एक मंत्री म्हणून होतो. आज मी राजीनामा देऊन बाहेर पडलो. अशा स्थितीमध्ये मला जे काही लोक भेटतात त्यांचेकडून मला दोन प्रश्‍न विचारण्यात येतात. एक, तुम्ही याचे अगोदर बाहेर का पडला नाहीत ? मी लवकर बाहेर आलो असतो तर काँग्रेस विरोधी संघटित योजना अंमलात आणता आली असती. जे काही काँग्रेस विरोधी गट व उपगट आहेत त्यात संघटितपणा आणता आला असता. दोन, दुसऱ्या लोकांचे म्हणणे असे की, चार वर्षाच्या कारकीर्दीत काँग्रेसशी संधी का करता आली नाही. घनिष्ठ संबंध का जुळला नाही.

यासंबंधाने मी खुलासा करू इच्छितो. माझ्या चार वर्षाच्या कारकीर्दीत मला काँग्रेसच्या लोकांचे अस्पृश्य किंवा मागासलेल्या लोकांच्या उत्रतीसंबंधी काय अंतरंग आहे, किती प्रेम आहे, किती तळमळ आहे ; त्यांची उदात्त तत्त्वांबद्दल किती निष्ठा आहे हे अगदी जवळून पाहता आले. जे लोक अस्पृश्यांचा उद्धार