२५-११-१९५१ लोकशाहीत विरोधी पक्षाची फार आवश्यकता असते - Page 330

२९० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

देणारे प्रत्रक काढायला पाहिजे होते. निदान त्यांच्या सरकारी दप्तरात तर ही माहिती असेल की नाही ? मुंबईला येण्यापूर्वी व जाहीर सभेत माझ्या आरोपाला उत्तर देण्यापूर्वी आपल्या खात्याकडून त्यांनी ही माहिती का आणली नाही ? माझी पत्रके व वेळोवेळी पाठविलेली पत्रे पंडित नेहरूजवळ असतीलच. निदान माझ्याजवळ त्यांच्या प्रती आहेतच. तेव्हा त्यातील आरोपांना मुद्देसूद उत्तर द्या असे माझे नेहरूंना सांगणे आहे.

त्यांच्या परराष्ट्र धोरणावर माझा दुसरा आरोप आहे. मंत्रीमंडळात असताना मी त्यासंबंधी काहीही बोललो नाही असे नेहरूंचे म्हणणे आहे. पहिली गोष्ट अशी की, मी १५ ऑगस्ट १९४७ पासून ते २६ जानेवारी १९५० पर्यंत घटनेच्या कामात व्यग्र होतो. तेव्हा परराष्ट्र धोरणावर मला नेहरूंशी बोलायला वेळच मिळाला नाही. दुसरे असे की, समजा त्यावेळी मी नेहरूंशी बोललो नाही म्हणून माझे म्हणणे चूक कसे ठरते ? समजा त्यावेळी त्याची वाच्यता न करण्यात माझी व्यक्तिगत चूक झाली पण तेवढीच सबब पुढे करून तुम्ही माझ्या मुद्यांना बगल कशी देता ? मी त्याच वेळी ते बोललो का नाही, म्हणजे राजीनामा देऊन निघून का गेलो नाही असेच जर पंडित नेहरूंना सुचवायचे असेल तर मी त्यांना एवढे सांगतो की, मंत्र्यांना असे मोठमोठे निर्णय तारतम्याने घ्यावे लागतात. प्रत्येक मुद्यावर मतभेद झाल्याबरोबर राजीनामे देण्याची साथ सुरू झाली तर मोठा अनवस्था प्रसंग ओढवेल.

मतभेद असतानाही मी मंत्रीमंडळात राहिलो याचे मुख्य कारण राष्ट्राची घटना' तयार करण्याचे महान कार्य माझ्या शिरावर होते. मी ते सर्वात अधिक महत्त्वाचे समजत होतो. ते पार पाडण्यात माझ्या कर्तव्यबुद्धिचाच भाग होता. त्या कामावर मी लाथ मारून बाहेर जावे असे म्हणणाऱ्या माणसाला वेड्यातच काढले

पाहिजे.

म्हणूनच मी म्हणतो की, अशा प्रकारची हास्यास्पद विधाने न करता काश्मीर प्रश्‍न किंवा भारताचे परराष्ट्रीय धोरण यावरील माझी विधाने कसोटीला लावून पहा व त्यांना उत्तरे देण्याचा प्रयत्न करा.

नेहरू म्हणजे काँग्रेस हा भ्रम आहे. नेहरू स्वप्नाळू व भोळे आहेत. काँग्रेसवाले नेहरूंच्या पाठिशी नाहीत याची अनेक उदाहरणे देता येतील. काँग्रेसच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी टंडण विरूद्ध कृपलानी असा झालेला सामना,