लोकशाहीत विरोधी पक्षाची फार आवश्यकता असते २९१
खरा पटेल विरूद्ध नेहरू असा होता. प्रथम नेहरूंनी श्री. शंकरराव देवांना हळद लावून बाशिंग बांधून तयार केले. पण या नवऱ्या मुलाला कोणतीही नवरी मिळणार नाही हे पाहून कृपलानींना उभे केले. अखेर कृपलानीही पडले. पर्यायाने हा नेहरूंचाच पराभव होता. सरदार पटेलांच्या मृत्यूनंतर नेहरू हेच काँग्रेसचे एकमेव पुढारी म्हणून राहिले. |
तरीसुद्धा नेहरूंच्या मागे काँग्रेस आली नाही. बंगलोर काँग्रेसमध्ये नेहरूंच्या हाती सर्व सूत्रे सोपविण्याची सूचना त्यांच्याच एका दिल्लीच्या मित्राने आणली पण तिला दुजोरा द्यायलाही कुणी मिळाले नाही. नेहरूंनी राजीनाम्याची धमकी दिल्यानंतरही टंडणजीनी राजीनामा देण्याचे काही कारण नाही, असे काँग्रेस कार्यकारिणीने सांगितले. याचा अर्थ असा की, नेहरू काँग्रेसमधून गेले तरी हरकत नाही इतकी काँग्रेसवाल्यांची तयारी होती. ' पण निवडणुका दिसू लागल्याबरोबर अकस्मात हे चित्र बदलले. एखाद्या मशहूर सिनेमा नटीच्या भूमिकेमुळे चित्रपटाला भाव येतो. मग त्यात इतर काही नसले तरी चालते. काँग्रेसवाल्यांना निवडणुका जिकण्यासाठी टंडण ही काही विशेष योग्य नटी वाटली नाही. म्हणून माझा नेहरूंना असा सवाल आहे की, काँग्रेसवाले
आज तुमच्या पाठिशी आहेत ते तुमच्यावरील प्रेमामुळे की तुमचा निवडणुका
जिंकण्यासाठी वापर करून घेण्यासाठी? मी जर नेहरूंच्या जागी असतो तर माझ्या मनात हा प्रश्न निर्माण झाला असता. चार वर्ष मी काँग्रेसवाल्यांच्या सान्निध्यात होतो. त्यांच्या कानाकोपऱ्यात काय चालते, कोण लोक नेहरूंविषयी . काय काय बोलतात हे मी नेहरूंपेक्षाही अधिक जाणतो.
काँग्रेस हाच देशातील एकमेव सुसंघटित पक्ष आहे, त्याशिवाय दुसरा कोणताही पक्ष स्थिर सरकार स्थापू शकणार नाही असे सांगणाऱ्यांना मी विचारतो की, काँग्रेसमध्ये जी बजबजपुरी माजली आहे ती सोडली तरीही कांग्रेस वरिष्ठात तरी मतैक्य आहे काय? मला वाटते निवडणुका संपल्यावर तर हे वाद अधिक उफाळून
वर येतील. खुद्द राजेंद्रप्रसाद व पंडित नेहरू यांच्यात धुसफूस सुरू असावी
असा माझा तर्क आहे. त्यांचे परस्पर आलिंगनाचे फोटो म्हणजे नागरी
संस्कृतीतील खोटी औपचारिकता आहे. हिंदू कोडाच्या प्रश्नावर त्यांचे मतभेद
दिसलेच. तसेच मागे राष्ट्राध्यक्ष कुणी व्हावे हे ठरविण्याच्या वेळी नेहरूंनी
राजाजींना व पटेलांनी राजेंद्रप्रसादांना पाठिंबा दिला होता हेही माहीत
आहे. निवडणुकानंतर पुन्हा यावर झुंज होईलच.