२९६
शिक्षित मुले समाजाच्या उन्नतीप्रित्यर्थ
काही करणार आहेत का ?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दिनांक २० जुलै १९५२ रोजी महार समाज सेवा संघाने पुष्पहार अर्पण केला, ततूप्रसंगी संघाने इमारत फंडास २६ रुपये देणगी दिली व पुढील निवेदन केले.
कार्यकारी मंडळाने परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याच आशिर्वादाने सिद्धार्थ बोर्डींग संगमनेर व कर्जत येथे सध्या शिक्षण घेत असलेल्या ७५ मुलांच्या दोन वसतिगृहांची माहिती सांगितली, पैकी कर्जत वसतिगृहास ग्रँट मिळवावयाची आहे. सदर वसतिगृह ग्रँटशिवाय चालविता येणे दुरापास्त आहे.
सिद्धार्थ बोर्डींग संगमनेर या संस्थेस थोडी फार सरकारी मदत मिळते. त्यामुळे त्या वसतिगृहासाठी स्वतंत्र इमारत बांधण्याचा विचार चालू आहे. आपण या इमारतीस आशिर्वाद दिल्यास आमचा उत्साह द्विगुणित होऊन हे अवघड काम संघ शिरावर घेऊन पार पाडू शकेल असे कार्यकर्त्यांनी सांगितल्यानंतर बाबासाहेब आफ्ल्या भाषणात म्हणाले,
तुम्ही हे सामाजिक कार्य करता त्याबद्दल मला समाधान वाटते. तुमच्या संगमनेर वसतिगृहाच्या इमारत फंडास मी शुभेच्छा प्रगट करतो. पण मला लोकांना एक प्रश्न विचारावासा वाटतो तो हा की, तुम्ही या समाजाच्या मुलांना स्वतः खस्ता खाऊन शिक्षण देता ती मुले शिक्षण संपादन केल्यानंतर तुमच्या समाजाच्या उन्नतीप्रित्यर्थ काही करणार आहेत का ? तुम्ही त्यांच्याकडून याबाबत काही प्रतिज्ञा लेख लिहून घेता काय ? (नाही. असे उत्तर मिळाल्यावर) पददलित समाजाची सेवा करण्यासाठी आपल्यातील काही मुले शिकून तयार व्हावीत म्हणून मी ' सिद्धार्थ कॉलेज ' काढले. पण अनुभव मात्र कटु येत आहे. शिक्षण संपादन केल्यानंतर एखादी मोठी नोकरी मिळाली | की बस्स ! झाले आपले काम !! मी कोण आहे? मला शिक्षण कोणी दिले ? कसे दिले ? त्यांनी किती कष्ट केले ? याची तिळमात्र जाणीव न ठेवता हे लोक आपल्या समाजाला विसरतात. या लोकांना काय म्हणावे हेच
जनता : २६ जुलै १९५२.