शिक्षित मुले समाजाच्या . . . . काही करणार आहेत का ? ३१५
मला समजत नाही, तेव्हा तुम्ही हा खटाटोप करता तो फुकट आहे असे मला वाटते, नाहीतर त्यांच्यावर काहीतरी बंधनकारक राहील असे करा. कोणाची पोरे बोडिंगात आणायची ? त्यांना शिक्षण द्यायचे कोणी ? आणि इतके केल्यावर . त्यांनी समाजाकडे ढुंकूनही पाहायचे नाही, हा कृतघ्नपणा नव्हे का ? माझे आयुष्य मी तुमच्या हितार्थ वेचतो आहे. पण माझ्या पश्चात या समाजाचे कसे होईल ? ही माझी चिंता दूर करणारी माणसे तुमच्यात अजून तयार होऊ नयेत ? या सर्व गोष्टींचा विचार केला की, मी माझे आयुष्य तुमच्यासाठी फुकट खर्ची घातले, असे वाटू लागते. |
मुंबईत मी तुमच्यासाठी मोठा हॉल लवकरच बांधणार आहे, त्यासाठी मी त्या दिवशी दामोदर हॉलमध्ये निवेदन केल्याप्रमाणे तुम्ही किती पैसे जमविले आणि मी किती जमविले हे स्पष्ट केले. माझ्या नावावर तुमचा किती पैसा बँकेत आहे, हे मी तुम्हाला स्पष्ट सांगून टाकले आहे. हेतू हा की, माझ्या पश्चात माझ्या मुलानेही त्यावर आपला हक्क सांगू नये व तुम्हालाही त्याची निश्चित कल्पना यावी. तरी सर्वांनी हा हॉल बांधण्यासाठी पराकाष्ठेने प्रयत्न कराः नगर जिल्हा, नाशिक जिल्हा, नंतर संगमनेर तालुका, पुढे माझ्या गावापुरते मी पाहीन; ही उतरती दुरावस्था थांबविलीच पाहिजे.