७-८-१९५२ मी संघर्ष करून अस्पृश्यात जाज्वल्य स्वाभिमान निर्माण केला आहे - Page 358

३१८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

ती दुःखे तुमच्यापेक्षा मला जास्त कळतात. ह्या दु:खाचे निवारण करण्यास एक मध्यवर्ती निधी हवा आहे, पैशाची जरूरी आहे.

दुसरी गोष्ट ही की, या सर्व तक्रारी एकत्र जमवून ठेवण्यासाठी मुंबईला आपल्या समाजाची एक मध्यवर्ती कचेरी हवी आहे. त्या कचेरीत काम करणाऱ्या लोकांना पगार द्यायला हवा. पण या गोष्टी जमणार कशा ? तेव्हा हा हॉल बांधून झाला तर वर्षाला लाखभर रुपये भाड्याच्या रूपाने आम्हाला मिळतील. हे ठिकाण मध्यवर्ती आहे. तेव्हा हा हॉल बांधून झाला तर ही एक मोठी अडचण दूर होईल.

केवळ माझे नाव घेऊन जयजयकार करण्यापेक्षा जी गोष्ट माझ्या दृष्टीने अत्यंत मोलाची आहे ती करण्यासाठी प्राणाच्या मोलाने तुम्ही झटां. मी हॉल बांधण्याच्या कार्याला फार मोठे महत्त्व देतो. त्यामुळे अस्पृश्य समाजावर खेडोपाडी घडणाऱ्या अत्याचाराचे तात्काळ आपल्याला निर्दालन करता येईल. तेव्हा तीन महिन्याच्या आत तुम्ही या कार्यासाठी खेड्यापाड्यातून एक. लाख रुपये जमवून पाठवा. प्रत्येक गावामधून ' दहा दहा ' रुपये जमवा आणि मुंबईला शेड्यूल्ड कास्ट्स्‌ इंप्रुव्हमेन्ट ट्रस्टचे सेक्रेटरी श्री. शांताराम अनाजी उपशाम यांच्याकडे पाठवा. तो हॉल बांधण्यास मला दसऱ्याला सुरवात करावयाची आहे. मला एक लाख रुपयांची तूट आहे. . तेव्हा प्रत्येक गावाकडून दहा दहा रुपयेप्रमाणे प्रत्येक तालुक्यातून एक एक हजार रुपये जमवून पाठविण्याचे कामास आजपासून लागा.