२८-९-१९५२ सार्वजनिक पैशाचा अपहार करण्यासारखे नीच कृत्य दुसरे नाही - Page 360

आंबेडकर लेखन आणि भाषणे ३२० डॉ. बाबासाहेब

भाषण करावयास नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे टाळ्यांच्या कडकडाटात

उठले. ते म्हणाले,

भगिनींनो व बंधुंनो,

आजकाल बऱ्याच लोकांचे मन राजकीय कार्यात गुंतले आहे. माझे मन मात्र आज राजकारणात रमत नाही. सध्या माझे सर्व लक्ष आपण इमारत फंड स्थापन केला आहे त्याकडे आहे. मुंबईत अनेक ज़ातीच्या इमारती आहेत. ब्राह्मणांची ज्ञातिगृहे आहेत. मराठ्यांची ज्ञातिगृहे आहेत. क्षत्रियांची ज्ञातिगृहे आहेत. एवढेच. नव्हे तर कुणब्यांनीही आपले ज्ञातिगृह किंवा हॉल बांधलेला आहे. त्याप्रमाणे अस्पृश्य समाजाचेही एक ज्ञातिगृह किंवा हॉल मुंबईत असावा ही कल्पना फार जुनी आहे. या कामासाठी मी १९३८ साली मुंबईत इमारत फंड स्थापन केला. हे कार्य अंगावर घेऊन आज १०-१५ वर्षे लोटली आहेत. तरीही या कार्याला अद्याप मूर्त स्वरूप आले नाही. आतातरी

हे कार्य पार पाडावयासच पाहिजे, असे मी ठरविले आहे. हे कार्य पार '

पाडल्याशिवाय मी दुसरे कोणतेही कार्य हातात घेणार नाही. तुम्ही सर्वानी हे काम अतिशय निकडीचे आहे असे समजून प्रत्येकाने यात अंतःकरणपूर्वक भाग घेतला पाहिजे. या कामासाठी आज मजजवळ पुढीलप्रमाणे रक्कम आहे. पूर्वीची शिल्लक ४० हजार रुपये, मुंबईच्या लोकांनी जमविलेले हीरक महोत्सवाचे १८

हजार रुपये, यात बाहेर गावचे १ हजार रुपये आहेत. मुंबई बाहेरील लोकांनी इमारत फंडासाठी पाठविलेले ४ हजार रुपये व बिनव्याजी मिळालेले ३२ हजार रुपये. बाकीची रक्कम तुम्ही सर्वानी जमविली पाहिजे. सदर कामासाठी कर्ज उभारण्याचा माझा विचार होता. परंतु तो आता मी सोडून दिला आहे. कारण कर्ज घेतले तर शेकडा १०-१२ रूपये आपणास निव्वळ व्याजासाठी

द्यावे लागणार. व्याजासाठी एवढी रक्क्म देण्याची माझी तयारी नाही. तुम्ही सर्वांनी मनावर घेतले तर कर्ज न घेताही हे काम आपणास पार पाडता येईल. मुंबईत चाळ कमिट्या नेमून व मुंबईबाहेर काही गावच्या गाव कमिट्या किंवा तालुका कमिट्या नेमून हे काम तुम्ही केले पाहिजे. याबाबतीत मी परत काही सांगणार नाही. हे सांगण्यासाठीच मी आज येथे आलो. पहिल्या तारखेनंतर मी दिल्लीस जाणार आहे आणि कदाचित बरेच दिवस परत येणार नाही. मी येथे नाही म्हणून तुम्ही हे काम पाडून ठेवता कामा नये. मी येथे असताना जे काम चालले आहे त्यापेक्षाही जोराने काम मी मुंबईबाहेर गेल्यावर तुम्ही केले पाहिजे. तुमच्या कामाचे रिपोर्ट मी दिल्लीला गेल्यावर तिकडे आले पाहिजेत व ते मला समाधान देतील असे पाहिजेत. येथे ज्या संस्थांतर्फे संमेलन . घेण्यात आले आहे त्या सर्वांनी हे कार्य आपले आहे असे समजून आपापल्या विभागात कामास लागले पाहिजे.