२२-१२-१९५२ लोकशाहीच्या यशस्वी कामकाजाच्या पूर्वावती शती - Page 365

३००
लोकशाहीच्या यशस्वी कामकाजाच्या पूर्वावर्ती शर्ती

“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रकृती साधारण जून १९५२ पासून सुधारू लागून आराम वाटू लागला. मागील १०-१५ वर्षात, भगवान बुद्धाचे चरित्र व कार्य या संबंधी जे प्रचंड वाङ्मय वाचले होते त्याची टिप्पणे ते जुलै महिन्यात काढू लागले, मधून मधून ते इतर ग्रंथ लिहिण्यासाठीही वाचन करून टिप्पणे तयार करून ठेवीत असत. त्यांना निरनिराळ्या संस्थांकडून भाषणे करण्याची ` आमंत्रणे येत होती ; पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी कोणालाच होकार दिला नाही. गेले वर्षभर पुणेकर मंडळी त्यांचे व्याख्यान ठेवण्यासाठी धडपडत होती. पण साहेबांनी त्यांनाही होकार दिला नव्हता. ऑक्टोबरमध्ये बाबासाहेब परत मुंबईला आले तेव्हा पुण्याचे दोन वकील त्यांना भेटावयास आले. पुण्यात एखाद्या चांगल्या विषयावर बाबासाहेबांनी भाषण करावे, अशी पुनः त्यांनी बाबासाहेबांना नम्रपणे आग्रहाची विनंती केली. बाबासाहेबांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन, व्याख्यान देण्याचे कबूल केले, नंतर विषयासंबंधी पत्रव्यवहार झाला व विषय निवडण्यात आला, खरी लोकशाही म्हणजे काय व ती टिकविण्यास कोणती कारणे लागतात वगैरे मुद्यांवर बाबासाहेबांनी आपले विचार प्रदर्शित करावयाचे ठरविले. हे बाबासाहेबांचे विचार सर्व भारतीय जनतेला समजावेत अशी व्यवस्था आपण करणार आहोत, असे भेटीला आलेल्या वकीलांनी सांगितले होते म्हणून बाबासाहेबांनी त्याचा खुलासा विचारला तेव्हा त्यांचे भाषण छापून प्रसिद्ध करण्याचे त्यांनी बाबासाहेबांना कळविले. ही योजना बाबासाहेबांना पसंत पडली व भाषणाची तारीख २२ डिसेंबर १९५२ ठरविण्यात आली. बाबासाहेबांनी आपले भाषण डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तयार केले. ते श्री. नानकचंद रत्तु यांनी टाईप केले. ** |

'“ ठरविल्यानुसार दिनांक २२ डिसेंबर १९५२ रोजी सायंकाळी पुणा डिस्ट्रिक्ट लॉ लायब्ररीच्या हॉलमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

प्रथम डिस्ट्रिक्ट लॉ लायब्ररीतर्फे पुण्यातील सुप्रसिद्ध वकील कै. ल. र. उफ तात्यासाहेब गोखले यांच्या तैलचित्राचे अनावरण डॉ. आंबेडकर यांच्या हस्ते झाले. तसेच श्री. ए. बी. सेठना व हरि विठ्ठल तुळपुळे यांनी लायब्ररीस दिलेल्या पुस्तक संग्रहाचे उद्घाटनही डॉ. आंबेडकरांच्या हस्ते झाले. या समारंभास

` डॉ. भी. रा. आंबेडकर चरित्र : चां. भ. खैरमोडे, खंड ११ पृ.२०-२१.