२२-१२-१९५२ लोकशाहीच्या यशस्वी कामकाजाच्या पूर्वावती शती - Page 377

लोकशाहीच्या यशस्वी कामकाजाच्या पूर्वावर्ती शर्ती ३३७

केला नाही. "' नीतिशास्त्र हे राजकारणापासून काहीतरी वेगळे आहे. आपण राजकारण शिकू शकतो आणि आपण नीतिशास्त्रासंबंधी काहीही जाणत नसलो तरी चालेल कारण राजकारण जणू काही नीतिशास्त्राशिवाय काम करु शकते." माझ्या मताप्रमाणे हे एक थक्क करून सोडणारे विधान आहे. शेवटी लोकशाहीत नेमके काय घडते ? "मुक्त शासन' असे लोकशाही संबंधाने बोलले जाते आणि 'मुक्त शासन' म्हणजे आपण काय समजतो ? मुक्त शासन म्हणजे समाज जीवनाच्या भव्य दृष्टिकोनातून लोकांना कायद्याच्या हस्तक्षेपाशिवाय प्रगतीसाठी मोकळे सोडणे होय ! किंवा जर कायदाच करावयाचा असेल तर कायदा करणाऱ्याला अशी खात्री पाहिजे की, कायदा यशस्वी होण्यासाठी समाजामध्ये पुरेसे नैतिक अधिष्ठान आहे. लोकशाहीच्या या पैलूचा ज्याने उल्लेख केला आहे असा माझ्या मताप्रमाणे लास्की हाच एक माणूस आहे, त्याच्या एका पुस्तकात त्याने असे अत्यंत ठामपणे सांगितले आहे की "लोकशाहीत, नेतिक सुस्थिती नेहमीच ग्राह्य मानावी लागते.' जर नैतिक सुस्थिती नसेल तर लोकशाहीचे आज आपल्या देशात ज्याप्रमाणे होताहेत त्याप्रमाणे तुकडे तुकडे होतील. |

निर्देश करण्यासारखा शेवटचा मुद्दा म्हणजे लोकशाहीला 'लोकनिष्ठेची' फार आवश्यकता असते. सर्वच देशामध्ये अन्याय असतो याबद्दल शंका नाही. परंतु त्याची तीव्रता सर्व ठिकाणी सारखीच नसते. काही देशामध्ये अन्यायाची तीव्रता फारच कमी असते आणि दुसऱ्या काही ठिकाणी लोक अक्षरशः अन्यायाच्या ओझ्याखाली चिरडले आहेत. या संदर्भात एखाद्याला इंग्लंडमधील ज्यूंचे उदाहरण नमूद करता येईल. खिश्चनांनी जे अन्याय केले त्यामध्ये ज्यू लोकांना त्यांच्यापासून सर्वात जास्त अन्याय सहन करावा लागला. जे घडले ते मात्र असे की, हा अन्याय दूर करण्यासाठी केवळ ज्यू लोकांनाच संघर्ष करावा लागला. या अन्यायाचे कारणसुद्धा असामान्य होते. आणि ते कारण असे होते की जुन्या खिश्चन कायद्याप्रमाणे मुलांना वडिलांच्या संपत्तीचा वारसा हक्क मिळत नसे. त्याला दुसरे तिसरे काही कारण नसून केवळ ते खिश्चन नव्हते

व ज्यू होते हे त्याचे कारण. तेथील राजा राज्यांचा अवशिष्ट मृत्यूपत्राने झालेला वारस होत असल्यामुळे दिवंगत ज्यूची संपत्ती तो स्वीकारीत असे. राजाला या गोष्टी अर्थातच प्रिय होत्या. राजा आनंदी होता. ज्यावेळेस दिवंगत ज्यूंची मुले वडिलांच्या संपत्तीचा वाटा मिळावा म्हणून निवेदन घेऊन राजाकडे जात असत त्यावेळेस राजा त्यांना थोडीशी संपत्ती देत असे व राहिलेली बहुतेक स्वतःकडे ठेवित असे. परंतु मी आपणाला अगोदर सांगितल्याप्रमाणे कोणत्याही इंग्रज माणसाने ज्यूना मदत केली नाही. अशा परिस्थितीत ज्यूनी त्यांचा संघर्ष चालू ठेवला. ज्याला 'लोकनिष्ठा' म्हणतात त्याच्या अभावाचा हा परिणाम आहे. लोकनिष्ठा म्हणजे सर्व अन्यायाच्या विरोधात आंदोलनासाठी उभी राहाणारी कर्तव्यनिष्ठा होय ! कोणावर अन्याय होतोय ही गोष्ट गौण आहे.