३३८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
याचाच अर्थ असा आहे की, प्रत्येकाने, मग तो त्या विशिष्ट अन्यायाखाली भरडलेला असो अगर नसो, अन्यायाखाली भरडल्या जाणाऱ्या माणसाच्या मुक्तीसाठी मदत करण्याची तयारी केली पाहिजे. विद्यमान काळातील उदाहरण म्हणून साऊथ आफ्रिकेचा आपण विचार करावा. तेथे अन्यायाखाली भरडली जाणारी जनता, अर्थातच भारतीय आहे. खरे आहे ना ? तेथील गोऱ्या लोकांवर अन्याय होत नाही. परंतु असे असूनदेखील एक गोरा माणूस म्हणजे रेव्हरंड स्कॉट हा अन्याय दूर करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. नुकतेच मी असे वाचत होतो की तेथील गोऱ्या वंशातील तरूण मुले मुली साऊथ आफ्रिकेतील भारतीय लोकांच्या मुक्ती आंदोलनात सहभागी होत आहेत. यालाच लोकनिष्ठा म्हणतात. आपणाला धक्का बसावा यासाठी मी हे सांगत नाही. परंतु काही वेळा मला असे वाटते की, आपण खरोखरच फार विसराळू आहोत. आपण साऊथ आफ्रिकेतील अन्यायासंबंधी बोलत आहोत. मी स्वतःशीच काही वेळेला या गोष्टीचे आश्चर्य करतो की, विलीनीकरण व अन्य गोष्टींच्या विरोधात बोलणाऱ्या आपणासारख्या लोकांकडे प्रत्येक खेड्यात साऊथ आफ्रिका नाही काय ? आपल्या प्रत्येक खेड्यात साऊथ आफ्रिका आहे. आणि असे असून देखील एखादा सवर्ण जातीतील माणूस वर्गीकृत वर्गाची समस्या घेऊन लढताना मला क्वचितच दिसतो. येथे असे का घडते ? कारण येथे लोकनिष्ठा नाही. "मी आणि बहुमतवाल्यांचा माझा देश याच एका विश्वामध्ये मी गुरफटलेला आहे.” जर अशा पद्धतीच्या गोष्टी घडल्या तर अन्यायाखाली चिरडल्या जाणाऱ्या अल्पसंख्यांकांना अन्यायाचे निवारण करण्याच्या हेतूसाठी इतरांच्यापासून मदत मिळणार नाही. याच गोष्टीमुळे लोकशाही धोक्यात आणणारी बंडाची मनोवृत्ती बळावेल.
शेवटी सभ्य गृहस्थहो, आणि महिलांनो, या ठिकाणी मला निमंत्रण देण्यापाठीमागे आपला काय हेतू किंवा प्रेरणा होती याची मला कल्पना नाही. मला या गोष्टीची शंका नाही की ज्या विषयासंबंधी मी आपणासमोर बोललो आहे तो विषय या देशासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आपली सर्वसाधारण धारणा आहे की आपणास स्वातंत्र्य मिळाले आहे. ब्रिटिश निघून गेले आहेत. लोकशाहीला पोषक असे संविधान मिळालेले आहे आणि अर्थातच, आपणास यापेक्षा जास्त काय हवे आहे ? यापेक्षा जास्त काही न करता आपला कार्यभाग संपलेला आहे असे समजून आपण आता विश्रांती घेतली पाहिजे, संविधान तयार झालेले असल्यामुळे आपला कार्यभाग संपलेला आहे अशा प्रकारच्या ' शिष्टपणाच्या ' भावनेविरूद्ध मला आपणास ताकीद देणे भाग आहे. कर्तव्य संपलेले नाही, त्याला आता कुठे सुरूवात झाली आहे. तुम्हाला याचे स्मरण ठेवावे लागेल की, लोकशाहीचे रोपटे सर्वच ठिकाणी वाढत नाही. ते अमेरिकेत वाढले, ते इंग्लंडमध्ये वाढले. काही प्रमाणात ते फ्रान्समध्ये वाढले.