२५-१२-१९५२ स्त्रियांनी आपल्या हक्कांसाठी मनोदौर्बल्य टाकून कंबर कसून पुढे आले पाहिजे - Page 382

३४२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

स्त्रियांच्या सर्वस्वी हिताचे हे बिल मंजूर करण्यासाठी स्त्रियांनी काहीच हालचाल केली नाही ही खेदपूर्वक बाब आहे. मी पुरूष असून देखिल स्त्रियांच्या हितासाठी भांडलो, पण स्त्रियांनी का उत्सुकता दाखविली नाही हे समजत नाही. या बिलाला पाठिंबा देण्याची गोष्ट तर बाजूलाच राहो, पण काही स्त्रियांनी माझ्याकडे येऊन ते बिल चांगले नाही असे मला सांगण्याचा प्रयत्न केला. मी दिल्लीत असताना तर काही प्रमुख स्त्रियांचे शिष्टमंडळच माझ्याकडे आले. त्यांना मी, ' ते बिल वाचले का ? ' म्हणून विचारले तर त्यांनी ते वाचले नाही असे सांगितले, न वाचताच का विरोध करता असे त्यातील मुख्य स्त्रीला बोलावून विचारता ती म्हणाली ' माझ्या नवऱ्याने मला सांगितले की, तू त्या बिलाला विरोध कर, नाही तर मी दुसरी बायको करून घेतो. म्हणून सवत पत्करण्यापेक्षा बिलालाच विरोध करणे मला भाग आहे. पण स्त्रियांची मानसिक दुर्बलता आहे. त्यांच्या या दुर्बलतेमुळेच या बिलाचा घात झाला. स्त्रियांच्या पायात ताकद असती तर ते बिल बारगळले नसते. पार्लमेंटमध्ये निवडून आलेल्या स्त्रियांनी देखील या बिलाबाबत काही जागरूकता दाखविली नाही. त्या स्त्री-सभासदांचे सारे लक्ष युनो, आय. एल. ओ., कोरिया या गोष्टीकडेच लागलेले असायचे ! माझ्या बिलाला पाठिंबा देण्यास त्या तयार दिसल्या नाहीत. कारण त्यामुळे पंतप्रधान नाखुष होतील व आपल्याला युनोत किवा दुसरीकडे कोठे जाण्यास संधी मिळणार नाही याची त्यांना भीती वाटते. अशा प्रकारच्या लोभी वृत्तीनेच आपल्या देशाचे नुकसान होत आहे. सार्वजनिक व राजकीय क्षेत्रात कार्य करणारा हरेक मनुष्य आज आपल्याला कमिशनर होता येईल काय किंवा अमुक जागा मिळेल काय या लोभाने धडपडत असतो. स्त्रियात हा दोष मला फार दिसतो. स्त्रियांच्या मनावर परंपरेचा पगडा जास्त असतो. त्यामुळे त्यांच्यात हे मनोदौर्बल्य आहे हे त्यांनी काढून टाकले पाहिजे.

इंग्लंडमधील स्त्रियांनी मतदानाचा हक्क मिळविण्यासाठी चळवळी केल्या आहेत. त्याचप्रमाणे स्त्रियांना आपली सुधारणा होण्यासाठी, आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यासाठी जर हे बिल यावे असे वाटत असेल तर त्यासाठी त्यांनी चळवळ केली पाहिजे. त्याखेरीज स्त्रीवर जुलूम करणारा पुरुष तिची सुधारणा करणार नाही. इंग्लंडमधील स्त्रिया आपल्या इच्छेप्रमाणे घटस्फोट घेऊन स्वतंत्र जीवन जगू शकतात. याचे मूळ कारण त्यांना संपत्तीचा वारसा हक्क असतो हे आहे. तसेच मलबारी समाजात गेल्या ५०-६० वर्षापासून घटस्फोट फारसे