२६-३-१९५३ संघटनेची ताकद प्रामाणिकपणा, एकनिष्ठता आणि शिस्तपालनावर अवलंबून - Page 390

३०६
संघटनेची ताकद प्रामाणिकपणा, [एकनिष्ठता ] [आणि ]
शिस्तपालनावर अवलंबून

शेड्यूल्ड कास्ट्स्‌ फेडरेशनच्या कार्यकारिणीची बैठक बुधवार ता. २५ आणि गुरुवार, तारीख २६ मार्च १९५३ रोजी २६ अलीपूर रोड, दिल्ली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या निवासस्थानी भरली होती. फेडरेशनचे अध्यक्ष श्री. एन. शिवराज ह्यांची प्रकृती बरी नसल्याने ते दिल्लीस येऊ शकले नाहीत म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे कामकाज चालले.

बैठकीस खासदार बापूसाहेब राजभोज, सरचिटणीस, श्री दादासाहेब गायकवाड (मुंबई), श्री तिलकचंद कुरील (उत्तर प्रदेश), आमदार ए. रत्नम (मद्रास), आमदार पी. एम. स्वामीदोराई (म्हैसूर), श्री. दशरथ पाटील, श्री. हरदास आवळे व श्री. रेवाराम कवाडे (मध्य प्रदेश), श्री. गंगाराम (मध्यभारत), सरदार हरवन्त सिंग (पंजाब), आमदार मियासिंग गिल (पेप्सू), मिल्कीराम (जम्मू व काश्मीर), श्री. बाल मुकुंद (पंजाब) आणि स्वामी दर्शनानंदजी (दिल्ली) आदि सभासद व निमंत्रित हजर होते.

डॉ. बाबासाहेब बैठकीस मार्गदर्शन करताना म्हणाले,

दलित समाजाची उन्नती केवळ दलित समाजाच्या संघटनेच्या ताकदीवर अवलंबून आहे. दलित समाजास घटनेनुसार सरकारकडून ज्या सवलती मिळाल्या आहेत त्या कायम स्वरूपाच्या नाहीत! आज ना उद्या त्या काढून घेतल्या जाणार. तेव्हा ह्या सवलतीवर, सरकारच्या 'कृपाळू' वृत्तीवर अवलंबून राहून दलित समाजाची उन्नती होणार नाही. त्यासाठी खंबीर, भरभक्कम, देशव्यापी अशी संघटनाच पाहिजे आणि म्हणून त्या कार्याकडेच आता दलित फेडरेशनच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपले लक्ष केंद्रीभूत केले पाहिजे. समाजाच्या प्रत्येक घटकाशी निकटचे संबंध आणून फेडरेशनच्या झेंड्याखाली त्यास आणावयाचे हा निर्धार करूनच कामास लागा; त्याशिवाय दलित समाजास आता दुसरा तरणोपाय

नाही.

जनता : १४ एप्रिल १९५३.