२७-४-१९५३ मी माझ्या आयुष्याचे शेवटचे दिवस बुद्ध धर्माच्या प्रचारातच व्यतीत करण्याचे ठरविले आहे - Page 393

मी माझे आयुष्याचे शेवटचे दिवस . . . . करण्याचे ठरविले आहे ३५३

केले. तेहतीस कोटी हिंदुंच्या जन्म दिवसास सुट्टी, मुसलमान, पारसी, जैन. ख्रिस्ती या धर्मातील देवांच्या जन्म दिवसास सुट्टी मिळते. मग बुद्ध जयंतीस का नको ? एकतर या सर्व सुट्यातून एखादी कमी करून ती आम्हास द्या अगर एक सुट्टी जास्त वाढवा, अशी मागणी मी श्री. नेहरूंकडे केली. पं. नेहरूंना बुद्धाबद्दल बराच आदर आहे. सुदैवाने नेहरू सरकारने बुद्ध जयंतीची सुट्टी चालू वर्षापासून जाहीर केली. परंतु आपल्या मुंबई सरकारने तिला हरताळ फासला. आपले मुंबई सरकार खूप सुसंस्कृत आहे. मुंबई सरकार कल्चरच कल्चर आहे. वाटल्यास तुम्ही त्यास ' अँग्रीकल्चर ' म्हणा. अशा या सरकारने सुट्टी न दिल्यामुळे पाच वाजता होणारी ही समा साडेसात वाजता होत आहे.

बुद्धाचे नाव काढले की ज्या हिंदू लोकांना एक प्रकारची भीती वाटत होती व आपणावर कोणी बाँब तर टाकीत नाही असे वाटत होते; त्यांच्यामधील कैक लोकात सुज्ञानपणा येऊन ते आज बुद्धाचा गौरव करू लागले आहेत. मी काही एखादा भविष्यवादी नाही व पुढे काय होईल हे सांगू शकत नाही, पण एक गोष्ट मात्र निश्‍चित सांगू शकतो की, बुद्धाचा धर्म या पृथ्वीतलावर पुन्हा अवतीर्ण होईल. तो कोणत्या मार्गाने येईल हे आज सांगता येत नाही.

मी एक बौद्ध धर्माचा उपासक आहे. मी नुसताच बोध घेतलेला नाही व नुसते बोलतो असे नाही तर प्रत्यक्ष कृती करून दाखवीन. माझे शेवटचे आयुष्याचे दिवस आता बुद्ध धर्माच्या प्रचारातच खर्च करण्याचे मी निश्‍चित ठरविले आहे. मी हे बुद्ध धर्म प्रचाराचे शेत पेरणार आहे व त्यात कोणते पीक येते हे पाहाणार आहे. बुद्ध धर्माबद्दल आपणास विशेष आस्था का वाटते, असे मला अनेक लोक विचारतात. डॉ. राधाकृष्णन्‌ सारखे तत्त्ववेत्ते म्हणतात की, बौद्ध धर्मात विशेष असे काय आहे ? त्यात व हिंदू धर्मात काय फरक आहे ? उपनिषदातून बुद्धाने सारे काही घेतले, असे हिंदू तत्त्ववेत्ते म्हणतात. मला अशा लोकांबद्दल फारच आश्चर्य वाटते. ज्यांनी कोणी ब्राह्मणांच्या १३८ उपनिषदांचा अभ्यास केला असेल व ती पूर्णपणे वाचली असतील तर त्यात ब्रह्म व आत्मा या दोन गोष्टी शिवाय काय आहे, असेच त्यांना

वाटेल.

` उपनिषदांच्या या कारखान्यातील ब्रह्म व आत्मा या दोन गोष्टीकडे पाहिले तर बुद्धाने त्यापैकी एकही गोष्ट मान्य केली नाही. बुद्धाने स्पष्ट सांगितले की, मला ईश्वर नको, परमेश्‍वर नको तर या पृथ्वीतलावर जन्मास आलेल्या प्रत्येक माणसास सुख व शांती मिळाली पाहिजे व सर्वांनी सुखाने राहिले पाहिजे. बुद्धाने नुसती शांतताच सांगितली नाही. बुद्ध हा खरा विचारवंत होता. त्याच्यासारखा विचारवंत अजूनपर्यंत जगात झालाच नाही.