२७-४-१९५३ मी माझ्या आयुष्याचे शेवटचे दिवस बुद्ध धर्माच्या प्रचारातच व्यतीत करण्याचे ठरविले आहे - Page 394

३५४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

बुद्धाला वेद मुळीच मान्य नव्हते. हे त्यांनी स्पष्टपणे जाहीर केले होते. वर्णव्यवस्थाही बुद्धाला मान्य नव्हती. बुद्ध वाङ्मयात बुद्धाने चातुर्वर्ण्यावर पदोपदी प्रहार केलेले आहेत आणि त्यामुळेच त्याला कट्टर हिंदू धर्माचा कडवा विरोध झाला. या देशात तीन महत्त्वाचे पंथ आहेत. एक हिंदू. दोन जैन व तीन बुद्ध. जैनांबद्दल मला काहीच सांगावयाचे नाही. बुद्धाने जातीभेदावर कठोर प्रहार केले. मी ब्राह्मणांचा द्वेष करीत नाही, परंतु 'जरी ब्राह्मण झाला भ्रष्ट । तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ' हे मी मान्य करणार नाही, अशी त्याची विचारसरणी होती.

जातीभेदाचे मूळ कायमचे उपटून टाकण्यासाठी आपण हिंदू धर्माचा त्याग करणे आवश्यक आहे. चैनीत असलेल्यांना पायाखाली काय कुजत आहे, याची जाणीव येणार नाही. ही जातीभेदाची समाजरचनाच जर उलथून पाडावयाची असेल तर आपणास बौद्धधर्माचीच शिकवण अंमलात आणली पाहिजे. ही गोष्ट मी निव्वळ गळ्यापासून बोलत नसून बेंबीच्या देठापासून बोलत आहे. ज्याप्रमाणे पांडव हे वनवासात गेले असताना त्यांनी आपली शस्त्रास्त्रे एका शमीच्या झाडावर ठेवून गुप्तपणे वनवास पत्करला व नंतर तीच धनुष्ये घेऊन त्यांनी पराक्रम गाजविला त्याचप्रमाणे आम्हीही आमची आयुधे बाहेर काढणार आहोत. मी माझा प्रचार तुमच्यापुरताच मर्यादित न ठेवता साऱ्या हिंदू धर्माला या नव्या क्षेत्रात आणण्याचा प्रयत्न करीन. यश कितपत येते ते पाहू. मानवतेचे संरक्षण होण्यासाठी हिंदुस्थानलाच काय पण साऱया जगाला शेवटी बौद्ध धर्माची कास धरावी लागेल, यासाठी मी बौद्ध धर्माचे बायबल लिहीले आहे, ते लवकरच प्रसिद्ध होईल व ते वाचल्यावर बौद्ध धर्म स्वीकारावयाचा की नाही, हे तुमच्या हाती राहील. एकदा तुम्ही जो मार्ग चोखाळला तो तुमच्या लक्षात राहिला पाहिजे. बुद्धाचे एक देऊळ मी मुंबईत बांधणार आहे. बुद्ध धर्माचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आपण प्रत्येकजण या मंगलप्रसंगी प्रतिज्ञा करू या.