३०८
आपल्याला कमीपणा येईल
असा पोषाख करू नका
चेंबूर, मुंबई येथील 'अस्पृश्य संघटना मंडळा' तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना हीरक महोत्सवाच्या रूपाने इमारत फंडास १००१ रु. दिले. त्यानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शुक्रवार दिनांक २९ मे १९५३ रोजी चेंबूर विभागाला भेट दिली. सदर प्रसंगी हँडबिले काढली नव्हती तरीही स्त्री-पुरुषांचा अफाट जनसमुदाय जमला होता.
सदर प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी अस्पृश्यांनी वापरावयाचा पोषाख आणि दागदागिने याबाबत मार्गदर्शन केले. ते म्हणाले,
भगिनींनो व बंधुंनो,
तुम्ही आतापर्यंत हे एक हजार एक रुपये धरून चार हजारावर रक्कम इमारत फंडाला दिली आहे, अशी माहिती माझे मित्र व शे. का. इंप्रुव्हमेंट ट्रस्टचे सेक्रेटरी श्री. उपशाम यांनी मला दिली आहे. तुमच्या वस्तीच्या मानाने ही रक्कम बरीच मोठी आहे. . एवढी रक्कम तुम्ही दिल्याबद्दल मी समाधान व्यक्त करतो. तुम्ही जसे आपले कर्तव्य पार पाडले तसेच आपले सर्व लोक जर इमारत फंडाबद्दलचे आपले कर्तव्य पार पाडतील तर मुंबईतच हा फंड एक लाखावर जमेल व आपली इमारत टोलेजंग होईल अशी मला आशा वाटते.
अलिकडे आपल्या समाजातील तरुणांचा व तरुणींचा पोशाख मला आवडतो. नेहमी आपणाजवळ कमीतकमी दोन पोशाख पाहिजेत. आपणजो धंदा करतो त्यावेळी घालावयाचा एक पोषाख व धंदा संपल्यानंतर, शूचिर्भूत झाल्यानंतर घालावयाचा दुसरा पोषाख. मी पाहातो की आमचे काही लोक निरनिराळ्या ऑफिसात व कंपन्यात कामाला असतात. तेथे त्यांना खाकी युनिफॉर्म मिळतो. हा पोशाख त्यांनी कामापुरताच घालावा, घरी आल्यानंतर त्यांनी आपल्याला शोभेल असा पोशाख करावा. नोकरी-धंद्यातलाच पोशाख सभा, समारंभात किंवा लग्नकार्यासारख्या खाजगी प्रसंगी वापरणे [बरे ] [दिसत ]
नाही.
जनता : ६ जून १९५३.