३५६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
आपल्या समाजातील स्त्री-पुरूषांच्या पोशाखात अलिकडे पुष्कळच चांगला बदल झाला आहे, याबद्दल मला समाधान वाटते. मात्र जुन्या बायांच्या पोशाखात अद्याप बदल व्हावयास पाहिजे. त्यांना झंपर, पोलकी असा नवा पोशाख वापरणे आवडत नसेल तर त्यांनी तो वापरू नये. मात्र चोळी-लुगडे असा जुनाच पोशाख वापरावयाचा असला तरी. तो व्यवस्थित वापरावा. पोशाख भारी किमतीचाच पाहिजे, असे माझे म्हणणे नाही. पोशाख साधा का असेना, पण तो व्यवस्थित पाहिजे. पेशवाईत कपडे वापरण्यावर व दागिने घालण्यावर आपल्या लोकांवर पुष्कळच निर्बध होते. अस्पृश्यांनी मळके व फाटकेच कपडे वापरले पाहिजेत व चांदीचेच दागिने वापरले पाहिजेत, सोन्याचे दागिने वापरता कामा नयेत असा निर्बंध होता. परंतु ते निर्बध आता नाहीत. तरीही आमच्या जुन्या बाया वेळा, तोडे, फुल्या, मासोळ्या व जोडवी हे चांदीचे अवजड व बोजड दागिनेच वापरतात. त्यांनी ते वापरण्याचे सोडून दिले पाहिजे. नाकाला भोक पाडून भली मोठी नथ नाकात अडकविणेही बरे दिसत नाही. आपल्या पोशाखावरून आपण अमुक एका जातीचे आहोत, असे ओळखता येता कामा नये. नाही तर काही वेळा मोठी पंचाईत होते.
मी कॉलेजला शिक्षण घेत असताना एकदा लग्नकार्यासाठी आम्हाला गावी जावे लागले. आमच्याबरोबर आमच्या आप्तांपैकी काही जुन्या वळणाच्याही बाया . होत्या. मी, माझे बंधु व आमच्या कुटुंबातील मंडळीचा पोशाख व्यवस्थित होता. तेव्हा बंदरावर उतरल्याबरोबर हमाली करणाऱ्या कुळवाड्यांनी आमचे सामान उचलले व ते आमच्याबरोबर चालू लागले. अर्धी अधिक वाट चालून गेल्यावर त्यांच्या लक्षात आले की, आमच्याबरोबर चाललेल्या त्या जुन्या वळणाच्या बायांची व आमची जात एकच आहे. हे समजण्याचा अवकाश, त्यांनी आमचे सामान खाली ठेवले व हमाली न मागताच ते लोक पसार झाले. शेवटी आम्हाला दोन-चार खेपा करून ते सामान मुक्कामावर न्यावे लागले.
प्रत्येकाने आपल्या घरात दहा आणे किंमतीचा बुद्धाचा फोटो लावावा.