३०९
शीलाशिवाय शिक्षणाची किंमत केवळ शून्य
पूर्वी ठरल्याप्रमाणे रावळी कँप महिला मंडळाच्या विनंतीला मान देऊन, दि. ३ जून १९५३ रोजी सायंकाळी ७ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सौ. माईसाहेब आंबेडकर यांचेसह रावळी कँपला भेट दिली.
सदर प्रसंगी स्त्री-पुरुष समुदाय अतिशय प्रचंड होता. प्रथम अनेक भगिनींनी व संस्थांनी डॉ. बाबासाहेब व सौ. माईसाहेब आंबेडकर यास हार अर्पण केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर याप्रसंगी केलेल्या भाषणात म्हणाले,
भगिनींनो व बंधुंनो,
येथील स्त्रियांनी इमारत फंडाला १,००१ रुपये देण्याचे कबूल करून आज जी रक्कम दिली त्याबद्दल मी त्यांचे अंतःकरणपूर्वक आभार मानतो. या वस्तीत मी आज प्रथमच आलो आहे. आज येथील स्त्रियांनी जशी मदत केली तशीच येथील एक सोसायटीही इमारत फंडाला मदत देणार आहे. या सोसायटीची काही रक्कम म्युनिसीपालिटीत शिल्लक आहे. ती रक्कम ते इमारत फंडाला देणार आहेत. ती रक्कम या वस्तीने आतापर्यंत दिलेल्या सर्व रकमांपेक्षाही मोठी आहे. अर्थात ती घेण्यासाठी मला परत याठिकाणी यावे लागणार आहे व त्यावेळी मी जरूर येईन.
तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट आता मी सांगणार आहे. परवा दिनांक २७-५-१९५३ रोजी आपण मोठ्या प्रमाणावर बुद्ध जयंती साजरी केली. वास्तविक
आपण ही एक मोठी चांगली गोष्ट केली, असे मला वाटते. परंतु काही
वर्तमानपत्रांनी या गोष्टीला विपरित स्वरूप दिले. जेथे ३० हजार लोक हजर होते तेथे ३ हजार लोकच होते असे आपल्या बातमीत डोळ्यावर कातडे ओढलेल्या वर्तमानपत्रांनी ठोकून दिले. काहींनी तर बुद्ध जयंतीच्या बातमीला आपल्या वर्तमानपत्रात थाराच दिला नाही. हे त्यांचे नेहमीचेच आहे. डॉ. आंबेडकरांचे कार्य म्हटले की, एकतर त्याला प्रसिद्धीच द्यावयाची नाही आणि प्रसिद्धी दिलीच तर त्या कार्यालां गौणत्व तरी आणावयाचे किंवा विपरीत स्वरूप तरी द्यावयाचे ! बुद्ध जयंतीवर वर्तमानपत्रात जी टीका आलेली आहे [त्या ] [टीकेला ] समर्पक व सविस्तर उत्तर मी देणार आहे. या वर्तमानपत्रात आलेल्या [टीकेचा ] तुमच्यावर मात्र विपरीत परिणाम होऊ देऊ नका. मी तुम्हाला जे काही सांगतो आहे ते अगोदर तुम्ही नीट समजावून घ्या व मगच [त्यावर ] [विशवास ] [ठेवावयाचा ]
किंवा नाही ते ठरवा.
जनता : १३ जून १९५३.