३-६-१९५३ एशीलाशिवाय शिक्षणाची किंमत केवळ शून्य - Page 399

शीलाशिवाय शिक्षणाची किंमत केवळ शून्य ३५९

शिकावयास होती. तर महाराचा मी एकटाच पोर त्या शाळेत होतो. आज सिद्धार्थ कॉलेजात पाहा. इतरांपेक्षाही आपल्या मुलांचा पोशाख चांगला असतो. पहिल्या वर्षी सिद्धार्थ कॉलेजात अस्पृश्यांची १५-२० मुलेच होती. परंतु आज पाहा. अस्पृश्यांची ३०० मुले सिद्धार्थ कॉलेजात शिकत आहेत.

दुसरी गोष्ट धर्माची. मनुष्याने स्वार्थच करीत न राहाता थोडाफार परार्थही केला पाहिजे. यासाठीच धर्माची जरूरी आहे. तुमच्यासाठी हे सर्व मी करीत आहे. मला हे धर्माने शिकविले. नुसते पोट भरले म्हणजे सर्व काही झाले असे समजू नका. पोट काय रांडरळीसुद्धा भरते. "” कबीर कहे कूच उद्दम कीजे। आप खाये, और औरनको दीजे “। या कबीराच्या दोह्याप्रमाणे उद्योग करा, आपण खा व दुसऱ्यांनाही द्या. स्वार्थ व परार्थ दोन्ही साधा. घर प्रथम सांभाळा. मात्र समाजकार्यालाही मदत करा.

एका लोहित नावाच्या ब्राह्मणाने बुद्धाला दोन प्रश्‍न विचारले होते. पहिला प्रश्‍न हा की, विद्या ही ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या तीन वर्गानाच शिकविली पाहिजे. शूद्र या चौथ्या वर्गाला विद्या शिकविता कामा नये, हे तत्त्व तू का मान्य करीत नाहीस ? याला उत्तर मिळाले ते असे : चार वर्ग हे धंद्याकरिता पडलेले आहेत परंतु ज्ञान हा काही रोजगारीचा प्रश्‍न होऊ शकत नाही. ज्ञान हे जीवनाला अत्यंत आवश्यक आहे. ज्ञान नसल्यामुळे आपले अत्यंत नुकसान होते. उदा. नाशिकला एका शेतकऱ्याकडे एक खतपत्र होते. सर्व काही व्यवस्थित होते. केस त्याच्या बाजूची व्हावयास पाहिजे होती. परंतु त्याच्या वकिलाने त्याला दम दिल्यामुळे विरुद्ध निकाल लागला. हे झाले ते त्या

शेतकऱ्याच्या अज्ञानामुळे झाले.

हिन्दुस्थानात जातीभेद राहिला याला मुख्य दोन कारणे आहेत. एकतर सर्वाना शस्त्रे वापरण्याची परवानगी नव्हती व दुसरी गोष्ट अज्ञान. मी पूर्वजांना पुष्कळ शिव्या देतो की, त्यांनी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार का केला नाही. परंतु त्याला वर वर्णन केलेली परिस्थितीच कारणीभूत होती.

' तव्याचा जाय बुरसा, मग तो सहजच होय आरसा ' या न्यायाने आता आपण स्वतःच आपल्यातील कमीपणा घालविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इतरांनी मदत केली नाही तरी आपली सुधारणा आपणच केली पाहिजे आणि आपण अशारीतीने सुधारलो तर इतरांना आपणाला दोषी ठरविता येणार नाही. आपला कलंक आपणंच काढला पाहिजे. समजा आपल्यातले लोक शिकले, ऑफिसर झाले तर इतरांना त्यांच्या हाताखाली काम करावेच लागणार व त्यांना मान द्यावाच लागणार. आमची व त्यांची स्थिती एक झाल्यावर आपल्याला ते कमी लेखणारच नाहीत.