३-६-१९५३ एशीलाशिवाय शिक्षणाची किंमत केवळ शून्य - Page 400

३६० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

प्रत्येक माणसाची काया, वाचा व मने अशी त्रिशुद्धी झाली पाहिजे. अशारितीने पवित्र झालेल्या माणसाला अपवित्र कोण म्हणणार ? त्यांच्यापेक्षा तुमचे कपडे डौलदार असल्यावर तुम्हाला कोण कमी लेखणार ? आमच्या उन्नतीचा प्रयत्न आता आम्हालाच करावयास पाहिजे.

आपण धर्मासाठी सत्याग्रह केला. धर्मांतराचा ठराव केला. सर्वकाही केले. आता आपण आपले मन पवित्र केले पाहिजे. आपला सद्गुणांकडे ओढा असला पाहिजे. अशारितीने आपण धार्मिक बनावयास पाहिजे. आपण शिकलो म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. शिक्षणाचे महत्त्व आहे यात शंका नाही. मात्र शिक्षणाबरोबरच माणसाचे शीलही सुधारले पाहिजे. शीलाशिवाय शिक्षणाची किंमत केवळ शून्य आहे. ज्ञान हे तरवारीसारखे आहे. समजा एखाद्या माणसाच्या हाती तरवार आहे. तिचा सदुपयोग की दुरूपयोग करावयाचा हे त्या माणसाच्या शीलावर अवलंबून राहील. तो त्या तरवारीने एखाद्याचा खूनही करील किंवा एखाद्याचा बचावही करील. ज्ञानाचेही तसेच आहे. एखादा शिकलेला माणूस त्याचे शील चांगले असेल तर आपल्या ज्ञानाचा उपयोग लोकांच्या कल्याणासाठी करील परंतु त्याचे शील चांगले नसेल तर तो आपल्या ज्ञानाचा उपयोग लोकांचे अकल्याण करण्याकडेही खर्च करील. शील हे धर्माचे मोठे अंग आहे. शिकलेली माणसे नुसती पोटभरू असून भागणार नाही. ज्यांना स्वार्थापलिकडे काही दिसत नाही; ज्यांना थोडाही परार्थ करता येत नाही ती माणसे नुसती शिकली म्हणून काय झाले ? त्यांचा दुसऱ्याला उपयोग तो काय ? 'तव्याचा जाय बुरसा, मग तो सहजच होय आरसा '. शिक्षणाचा उपयोग असा झाला पाहिजे.

जोतीबा फुले यांना मी आपला गुरू मानतो. माळी समाजात त्यांचा जन्म झाला व पुष्कळ मराठेही त्यांचे शिष्य होते. परंतु आजची परिस्थिती . मोठी चमत्कारिक झाली आहे. जोतीबांचे नाव आज कोणीच घेत नाही. आज मांग, चांभार हे निव्वळ उष्ट्याचे धनी झाले आहेत. प्रगतीचे खरे मालक आम्ही आहोत. आज आमच्यावर अन्याय होत आहे. आम्ही चळवळ करतो म्हणून इतर लोक आमच्याकडे खुनशीपणाने पाहात आहेत. परंतु आमची चळवळ निष्काम बुद्धिने व फळाची आसक्ती न धरता चालू आहे. आम्हाला आशा आहे की, एक दिवस असा येईल की या वृक्षाचे धनी आम्हीही होऊ. आज जे काही एक न करता चैन करतात, आपण न कमविलेले खात आहेत त्यांनाच पुढे शरम वाटेल.

प्रत्येकाने बुद्धाचा फोटो आपल्या घरात लावावा एवढे सांगून मी माझे भाषण संपवितो.