७-१९५३ आपल्या कार्यकर्त्याने राजकीय, धार्मिक आणि आर्थिक प्रश्नांचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे - Page 401

३१०
आपल्या कार्यकर्त्याने राजकीय, धार्मिक आणि
आर्थिक प्रश्‍नांचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे

जुलै १९५३ मध्ये मराठवाडा शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनच्या वतीने मराठवाडा भागातील* कार्यकर्त्यांच्या बैठकीत, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मार्गदर्शनपर _ भाषण केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले,

कार्यकर्त्यांची अशी भावना झाली आहे की, निवडणूक म्हणजेच राजकारण. निवडणुकाशिवाय राजकारणाला दुसरा काही अर्थच नाही अशीही भावना दिसते. म्हणूनच निवडणुकीच्या वेळी तिकीट मिळविण्यासाठी सर्वाची धडपड चाललेली असते आणि निवडणुका संपल्या की जो तो आपला स्वस्थ बसतो. परंतु समाजाचे आयुष्यात राजकारण हे एक अल्प कारण 'आहे. राजकारण म्हणजेच काही सर्वस्व नव्हे. खरे पाहिले तर पॉलिटिक्स, राजकारण जे काय आहे ते शेष अन्न आहे. समाजाची काही उन्नती होते, ती केवळ राजकारणाने होत नाही. समाज उन्नतीची अनेक कारणे आहेत. सामाजिक, आर्थिक या बाबी काही कमी महत्त्वाच्या नाहीत. समाजाची सर्वांगीण उन्नती होण्यासाठी या सर्व बाबींकडे सारख्याच प्रमाणात कार्यकर्त्यांनी लक्ष देणे जरुर आहे.

राजकारण हीच एक महत्त्वाची बाब आहे अशी भावना झाल्यामुळेच निवडणुकीच्या वेळी तिकीट मिळविण्यासाठी धडपड करणे, तिकिट न मिळाल्यास समाजात फाटाफूट करणे, निवडणुकीत पडल्यास निराश होऊन स्वस्थ झोपणे आणि निवडून आल्यास असेंब्लीमध्ये जाऊन तोंड बंद करून बसणे एवढेच कार्य आहे, असा कार्यकर्त्यांचा समज होत असतो.

या हैद्राबाद विभागात आज जवळ जवळ दोन वर्ष असेंब्लीचे कामकाज चालू झालेले आहे. या विभागात राखीव जागेवर एकंदर ३१ सभासद अस्पृश्य समाजाचे वतीने निवडून आले आहेत. परंतु या दोन वर्षात त्यांनी तेथे जाऊन काय केले? असेंब्लीमध्ये एकंदर तीन प्रकारे काम करावयाचे असते. असेंब्लीमध्ये एक, ठराव आणणे, दोन, बिल मांडणे आणि तीन, बजेटचा अभ्यास करून बजेटवर भाषण करणे. या तिन्ही गोष्टींपैकी, एखादी तरी

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे : संपादक मा. फ. गांजरे, खंड ७, पृ. ९९-१०३.

*माषणाचे स्थळ दर्शविलेले नाही-संपादक.