७-१९५३ आपल्या कार्यकर्त्याने राजकीय, धार्मिक आणि आर्थिक प्रश्नांचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे - Page 403

आपल्या कार्यकर्त्याने राजकीय, . . . . अभ्यास केला पाहिजे ३६३

तुम्हाला वाटते पुढारी होणे फार सोपे आहे पण माझ्या मते पुढारी होणे फारच अवघड काम आहे. मला स्वतःला पुढारीपण फार जड वाटते कारण इतरांसारखे माझे पुढारीपण नाही. मी ज्यावेळी चळवळ सुरू केली त्यावेळी कसल्याही तऱ्हेची संघटना नव्हती. मलाच स्वतःला सर्व कामे करावी लागत होती. संघटना करावयाची म्हटले तर मला स्वतःलाच ती करावी लागत असे. वर्तमानपत्र काढावयाचे म्हटले तर मलाच काढावे लागले. म्हणूनच 'मूकनायक', 'बहिष्कृत भारत', 'जनता' वगैरे वृत्तपत्रे मला स्वतःलाच काढावी लागली. प्रेस चालवावयाचा म्हटले तर मला स्वतःच प्रेसची जुळवाजुळव करावी लागली. थोडक्यात सांगायचे म्हटले म्हणजे मला शून्यातून सर्व निर्माण करावे लागले. मी असे म्हणत नाही की जे काय झाले आहे ते पूर्ण झाले आहे. तर मी असेच म्हणतो, मी जे काही केले ते व्हावयास पाहिजे त्याचा शतांश देखील झालेला नाही. अद्याप पुष्कळ करावयाचे शिल्लक आहे. रस्ता पुष्कळ चालून जावयाचे आहे. आतापर्यंत जे झाले ते फक्त रोपटे लावले आहे. चळवळीचा अद्याप वृक्ष वाढावयाचा आहे. सांगायचा उद्देश हाच की, आपल्यातील पुढाऱ्यांवर पुढारीपणाची फारच मोठी जबाबदारी आहे.

लोकात जागृती निर्माण करणे, त्यांची संघटना करणे हे अत्यंत महत्त्वाचे काम आहे. ते दरेक पुढाऱ्याने केले पाहिजे. आपल्या कार्यकर्त्याच्या अंगी फारच धैर्य असावयास पाहिजे. ज्याच्या अंगी धैर्य नाही तो पुढारीच होऊ शकत नाही. जो मनुष्य मरावयास तयार होतो तो कधीच मरत नाही आणि जो मरणास भितो तो अगोदरच मेलेला असतो असे समजावे. या देशातील हिंदू लोक आपणाला पुष्कळ त्रास देतील, आपल्या मार्गात अनेक अडचणी निर्माण करतील. परंतु काही झाले तरी आपण जो मार्ग स्वीकारलेला आहे, ज्याला

आपण इन्सानियत म्हणतो, माणुसकी म्हणतो, तो मिळविण्याचा मार्ग आपण कधीच

सोडता कामा नये. यासाठीच आपला प्रत्येक कार्यकर्ता धैर्यवान असावयाच पाहिजे. मान सन्मानाने वागणे हे आपले परम कर्तव्य आहे, असे समजले पाहिजे आणि त्याच्यासाठी आपली चळवळ चालू आहे.

दुसरी गोष्ट आपल्या लोकात देवभोळेपणा फारच शिरला आहे. जो तो उठला सुटला पंढरी-पैठण-आळंदीला जातो. मला आपणास हे विचारावयाचे आहे की पंढरी-पैठण-आळंदीला जाऊन आपण काय मिळविले आहे ? पंढरीला जाऊन कोणाचे भले झाले आहे काय ? किंवा आळंदीला जाऊन कोणाचा उद्धार झाला आहे काय ? तुम्ही एकनाथाला फार मोठा मानता, त्याने काय केले ? एक भागवत ग्रंथ लिहिला पण त्याची कथा मी आज तुम्हाला सांगतो. तो मेला