७-१९५३ आपल्या कार्यकर्त्याने राजकीय, धार्मिक आणि आर्थिक प्रश्नांचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे - Page 404

३६४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

त्यावेळी त्याची प्रेतयात्रा एका रस्त्याने जात होती. त्याच रस्त्याने एक सासुरवाशीण एक महार सोबतीला घेऊन सासरी जावयास निघाली होती. तिने ते एकनाथाचे मढे पाहिले. हा मला अपशकून झाला असे ती महारास बोलली. हे तिचे बोलणे एकनाथाच्या मळ्याने ऐकले तेव्हा एकनाथ तिरडीवर उठून बसला आणि त्या सासुरवाशीणीस बोलला “ मी आज मरत नाही. कारण तुला अपशकून होत आहे. “ असे म्हणून तो परत घरी गेला. नंतर पुढे एकनाथ व त्याची बायको यांनी नदीत जीव दिला. त्यांनी जीव का दिला याचा अद्याप शोध लागला नाही. आता तुम्हीच सांगा, कोणाचे तरी मढे जिवंत झाल्याचे तुम्ही ऐकले किंवा पाहिले आहे काय ?

दुसरे ज्ञानेशवराने तरी काय केले ? त्याने भगवद्गीतेवर ज्ञानेश्‍वरी नावाचा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचे सार काय ? तर जग हे ब्रह्ममय आहे. सर्व जगच जर ब्रह्म आहे तर मग महार मांगातही ब्रह्म असावयास पाहिजे. मग ज्ञानेश्‍वर महार मांगात का राहिला नाही ? ब्राह्मणाने आपणास परत घ्यावे म्हणून त्याने प्रयत्न का केला ? ब्राह्मणाने त्याला वाळीत टाकल्यानंतर त्याने त्यांना सांगावयास पाहिजे होते की, तुम्ही जरी मला जातीत घेतले नाही तरी हरकत नाही. मी महार-मांगात जाऊन राहीन कारण जग हे ब्रह्ममय आहे. असे ज्ञानेश्‍्वराने का सांगितले नाही. सर्वसाधारण जनतेला भुलविण्यासाठी हे सर्व थोतांड रचलेले आहे आणि या थोतांडाला तुम्ही सर्व भुललेले आहात. तेव्हा तुम्ही पंढरी-आळंदी किंवा जेजुरीला किंवा दुसऱ्या कोणा देवाच्या नादी लागलात तर तुम्हाला वाळीत टाकण्याचा मला हुकूम द्यावा लागेल. त्याच्याशिवाय तुमचा देवभोळेपणा जाणार नाही आणि तुमची सुधारणाही होणार नाही. आजचे हे युग विचाराचे युग आहे. कोणीही कसलेही थोतांड रचले तरी ते थोतांड आहे हे तुम्हाला ओळखता आले पाहिजे. कारण यापुढे तुम्हाला जगात वागताना विचार करूनच वागले पाहिजे.

आपण आपली संघटना मजबूत करावयास पाहिजे. आपसातील सर्व मतभेद बाजूस सारून एक विचाराने आपण वागले पाहिजे. कारण संघटना असल्याशिवाय जगात आपणास कोणीच विचारणार नाही. मला माहीत आहे की निवडणुकीच्या वेळी आपणास दुसऱ्या कोणाशी तरी हातमिळवणी करावी लागेल. पण आपली जर संघटनाच नसेल तर इतर लोक आपणाकडे येणार नाहीत. आपणास विचारणार नाहीत. पॉलिटिक्स करावयाचे असेल तर ते चांगल्या रीतीने केले पाहिजे. त्याकरिता लोकात जागृती निर्माण करून संघटना केली पाहिजे. मला पुढाऱ्याचे भय नाही. पुढारी जर चांगले वागले