३१४
आज देशात चारित्र्यच उरलेले नाही, ज्या देशाला
नीतीमत्ता नाही त्या देशाचे भवितव्य खडतर आहे
मुंबईच्या फेमस स्टुडियोमध्ये रविवार दिनांक एकतीस जानेवारी एकोणविसशे चौपन रोजी आचार्य अत्रे ह्यांच्या 'महात्मा फुले' ह्या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्तसमारंभ मोठ्या थाटामाटाने साजरा करण्यात आला. समारंभाचे अध्यक्षस्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी स्वीकारले होते आणि सातारचे कर्मवीर भाऊराव पाटील आशिर्वाद देण्यासाठी आचार्य अत्रे ह्यांच्या निमंत्रणावरून मुद्दाम उपस्थित झाले होते.
श्री. आचार्य अत्रे उपस्थित पाहुण्यांचे आभार मानताना म्हणालें, “महात्मा फुले ह्यांचे क्रान्तिकारक जीवन रुपेरी पडद्यावर आणण्याचे माझे अनेक वर्षाचे स्वप्न
आज साकार होत आहे, ह्याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे. पुणे शहराच्या
ज्या विभागात फुले ह्यांनी शंभर वर्षापूर्वी काम केले, त्याच क्षेत्रात माझी अनेक वर्षे गेली. त्यामुळे त्यांच्या कार्याचा आणि परंपरेचा माझ्या मनावर फार परिणाम झाला आहे. ह्या चित्रपटाचा प्रारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या हस्ते होत आहे, हा सर्वात मोठा सुयोग आहे. कारण महात्मा फुले ह्यांच्या तत्त्वज्ञानाचे सर्वात मोठे अनुयायी जर कुणी असतील, तर ते डॉ. आंबेडकर हेच होत. राजकारणातील, धर्मकारणातील आणि समाजकारणातील डॉ. आंबेडकरांची भूमिका सर्वस्वी महात्मा फुले ह्यांच्या सारखीच आहे, म्हणून महात्मा फुले ह्यांच्याबद्दल त्या काळात जो गैरसमज झाला, तोच डॉ. आंबेडकर ह्यांच्या आजही वाट्याला येत आहे. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील हे ह्या चित्रपटाला आशिर्वाद द्यावयास येथे उपस्थित राहिले हाही दुसरा सुयोग आहे; कारण त्यांनी आपले सबंध आयुष्य महात्मा फुले ह्यांच्या तत्त्वज्ञानाच्या
प्रचारामध्ये खर्च केले.
इंग्रजी भाषेमध्ये फुले यांचे चरित्र लिहिण्याची डॉ. आंबेडकरांची इच्छा आहे हे मला माहीत आहे. पण साधनांच्या अभावी ते तसेच पडून आहे. माझे काम झाल्यानंतर सर्व सामुग्री त्यांच्या हवाली करण्याची माझी इच्छा आहे. फुले ह्यांच्या जीवनासंबंधी सर्वसामान्य समाजात अज्ञान पसरलेले आहे. ह्या चित्रपटाद्वारे महात्मा फुल्यांच्या जीवनाचे दर्शन घडविण्याचा मी प्रयत्नं करीत
आहे."
जनता : ६ फेब्रुवारी १९५४.