३१-१-१९५४ आज देशात चारित्र्यच उरलेले नाही, ज्या देशाला नीतिमत्ता नाही त्या देशाचे भवितव्य खडतर आहे - Page 412

३७२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले,

हे काम हाती घेतल्याबद्दल मी श्री. अत्र्यांचे अभिनंदन करतो. कारण जोतीराव फुले हे आद्य समाज सुधारक होत ! पूर्वी, सामाजिक सुधारणा आधी की राजकीय सुधारणा आधी हा वाद चाले. आधी समाज सुधारणा झाल्या पाहिजेत असे रानडे, गोखले, आगरकर प्रतिपादन करीत; पण टिळकांचा भर राजकीय सुधारणांवरच होता. टिळक आपल्या विरोधकांवर याबाबतीत विजय मिळवू शकले नाही. पण पुढे महात्मा गांधींनी मात्र समाज सुधारणावाद्यांवर विजय मिळविला. परंतु समाज सुधारणा होण्यापूर्वी देशाला राजकीय स्वातंत्र्य मिळाले. त्याचे परिणाम फारसे चांगले झालेले नाहीत. आज देशात चारित्र्यच उरलेले नाही आणि ज्या देशाला नीतिमत्ता नाही त्या देशाचे भवितव्य अतिशय खडतर आहे. जवाहरलाल नेहरू, तुमचे मुख्यमंत्री असोत बा मोरारजी देसाई असोत, तुमच्या भविष्यात काळोखच भरला आहे. देशाचे मंत्री देशाचा उद्धार करीत नाहीत, तर धर्म ज्याला उत्तमरीतीने समजला आहे तोच देशाला तारू शकेल. महात्मा फुले अशा धर्मसुधारकांपैकी होते. त्यादृष्टीने ह्या थोर समाजसुधारकाच्या जीवनावर आधारलेला हा बोलपट उपयुक्त ठरेल.