२०-४-१९५४ धमोप्रमाणे राजकारणातही निष्ठा बाणली नाही तर तो "लफंग्यांचा बाजार" ठरेल - Page 413

३१५

धर्माप्रमाणे राजकारणातही निष्ठा बाणली नाही

तर तो '' लफग्यांचा बाजार '' ठरेल

शेड्यूल्ड कास्ट्स्‌ फेडरेशनचे प्रभावी नेते, अस्पृश्य समाजाचे अध्वर्यू आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सौ. माईसाहेब आंबेडकर ही दोघे ता. २० एप्रिल १९५४ रोजी सकाळी १० वाजता विमानाने दिल्लीहून नागपूरला आली. त्यांच्या स्वागतासाठी अस्पृश्य समाज हजारोंच्या संख्येने उपस्थित होता आणि डॉ. आंबेडकर माईसाहेबांसह विमानातून उतरताच 'आंबेडकर झिंदाबाद थोडे दिनमें भिमराज' इत्यादी घोषणांनी त्यांचे स्वागत करण्यात आले

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भंडारा द्विमतदारसंघातील संसदीय पोटनिवडणुकीत राखीव जागेसाठी उमेदवार म्हणून उभे आहेत आणि भंडारा मतदार संघात निवडणूक प्रचार करण्यासाठी ते नागपूरला आले आहेत.

विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी पंचवीस हजाराच्यावर अस्पृश्य स्त्री-पुरुषांचा . आणि लहान मोठ्यांचा संमर्द उपस्थित होता. - समता सैनिक दलाचे गणवेषधारी शेकडो स्वयंसेवक व्यवस्था ठेवण्यासाठी आणि डॉ. बाबासाहेबांना सलामी देण्यासाठी रांगेने उपस्थित होते

विमान नागपूर विमानतळावर उतरताच श्री. बापूसाहेब राजभोज यांनी त्यांचे स्वागत केले. विमानातून उतरताच डॉ. बाबासाहेब माईसाहेबांसह प्रचंड जनसमुदायाजवळ सावकाश गेले. तेथे निरनिराळया राजकीय पक्षांकडून त्यांच्या गळ्यात हार टाकून त्यांचे स्वागत करण्यात आले. नंतर मोटारीत बसून विश्रांतीसाठी ते माउंट हॉटेलकडे रवाना झाले. तेथेही त्यांच्या स्वागतासाठी दहा हजार जनसमुदाय उपस्थित होता. वाटेतही पुष्कळ ठिकाणी त्यांच्या दर्शनासाठी अनेक लोकांचे थवेचे थवे जमले होते. रात्री आठ वाजेपर्यंत डॉ. बाबासाहेबांच्या दर्शनासाठी माउंट हॉटेलच्या पटांगणात हजारोंच्या संख्येत जनसमुदाय उभा होता.

जनता : २४ एप्रिल १९५४.