| ३१७
आपला देश दोन राष्ट्रात विभागला आहे
एक वरच्या लोकांचे, दुसरे खालच्या लोकांचे
भंडारा संसद पोटनिवडणुकीत उभे असलेल्या चारही उमेदवारांचा निवडणूकः प्रचार आता या भागात अगदी शिगेस पोहचला आहे. दिनांक २१ एप्रिल १९५४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नागपूरहून निवडणूक प्रचारासाठी भंडारा येथे आले आणि सायंकाळी त्यांचे जाहीर भाषण झाले. वीस-वीस, पंचवीस कोसावरून बाबासाहेबांचे दर्शन घेण्यासाठी 'हजारो स्त्री-पुरुष भंडाऱ्यास जमा झाले होते. |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सायंकाळी ७-०० वाजता नव्या तलावाशेजारी विस्तीर्ण मैदानावर आले. या मैदानावर प्रशस्त व्यासपीठ व शामियाना उभारण्यात आला होता. गावोगावाहून आलेले हजारो लोक बाबासाहेबांच्या स्वागतासाठी अत्यंत आतुर झाले होते. बाबासाहेब सभास्थानी येताच '' आंबेडकर जिंदाबाद ”, '“ आंबेडकर कोण आहेत ? आमचा राजा आहे" अशा घोषणांनी सारे वातावरण दुमदुमून गेले.
सुरवातीस भजनाचा कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम चालू असतानाच बाबासाहेबांना अनेक संस्थांकडून आणि व्यक्तींकडून हार अर्पण करण्यात आले. डॉ. बाबासाहेबांच्या बरोबर सौ. आंबेडकर, शे. का. फे. चे सरचिटणीस श्री. राजभोज, श्री. कांबळे, श्री. गायकवाड आदी मंडळी व्यासपीठावर चढली. भूतपूर्व म. प्र. शे. का. फे. चे अध्यक्ष श्री. दशरथ पाटील, बॅ. खोब्रागडे, श्री. आवळे, श्री. ना. ह. कुंभारे, श्री. भाऊसाहेब दलाल, श्री. निनावे वकील आदी मंडळी व्यासपीठावर दिसत होती.
व्यासपीठावरून समोरच्या जनसंमर्दाकडे पाहाताच कोणालाही पं. नेहरू यांच्या सभेला लोटणाऱ्या गर्दीची सहज आठवण होई. कमीत कमी दोन लाख लोक मोठ्या उत्साहाने या सभेला हजर झाले होते. भंडाऱ्यात एवढी प्रचंड जाहीर सभा आजपर्यंत कधी झाली नाही.
तरुण भारत, नागपूर : २३ एप्रिल १९५४.