२१-४-१९५४ आपला देश दोन राष्ट्रांत विभागला आहे. एक वरच्या लोकांचे, दुसरे खालच्या लोकांचे - Page 418

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ३७८

हार समर्पणानंतर बाबासाहेबांना सुयश चिंतणारे आणि त्यांना निवडून आणण्याचे आश्वासन देणारे एक सुंदर गाणे खड्या आवाजात गायले गेले.

या सभेत बाबासाहेबांविषयीचा आपला आदर आणि भक्ती व्यक्‍त करण्यासाठी कारंजाचे श्री. महादेव बोरकर यांनी ५०१ रुपये व श्री. चंद्रभान श्यामकुवर यांनी

१०१ रुपये बाबासाहेबांना अर्पण केले.

प्रथम नागपूर प्र. शे. का. फे. चे अध्यक्ष बॅ. खोब्रागडे यांनी प्रास्ताविक भाषण करून पोटनिवडणुकीची पार्श्वभूमी थोडक्यात सांगितली.

त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर बोलावयास उभे राहिले आणि त्या दोन लाखांच्या जमावाने पुन्हा एकदा उच्चरवाने बाबासाहेबांचा जयजयकार केला. जवळपास दीड तास त्यांचे भाषण झाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाषणाला सुरवात करून म्हणाले, जी दोन माणसे संसदेत पाठवायची आहेत त्यापैकी मी एक उमेदवार म्हणून उभा आहे. मला निवडणुकीत उभे राहाण्याची आवश्यकता नाही कारण मी वरच्या लोकसभेचा* सभासद आहे. पण खेदाची गोष्ट अशी की, या वरिष्ठ सभागृहात काहीही काम होत नाही, असे मी पाहिले आहे. मध्यवर्ती सरकारला वरिष्ठ लोकसभेची बैठक वारंवार भरवून देशहिताचे कार्य तिच्याकडून करून घेण्याची इच्छा नाही म्हणून मी शेवटी संसद निवडणुकीत उभे राहावयाचे ठरविले.

. दोन जागांसाठी चार उमेदवार उभे असल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे. कोणाला मत द्यावे, हे निश्‍चितपणे लोकांना सांगण्यासाठी मी हा दौरा सुरू केला आहे. मला प्रकृतीच्या कारणास्तव सर्वच ठिकाणी जाता येणे शक्य नसल्याने दोन-चार प्रमुख ठिकाणीच जाणार आहे. पण आज येथे काही कारणांमुळे उपस्थित नसलेल्यांना माझे विचार तुम्ही पोचवाल अशी आशा आहे.

संसदेतील ५०० पैकी सुमारे ४०० सदस्य काँग्रेसचे आहेत. अशी स्थिती असूनही हरेक मतदान क्षेत्रात कोणी उमेदवार उभा राहिला की, त्याला विरोध करणे हे लोकशाहीला लज्जास्पद आहे आणि ही झुंज ते लढवितात ते मारवाड्यांच्या पैशाच्या जोरावर. काँग्रेसने दोन उमेदवार उभे केले आहेत. त्यांचा हेतू काय ? तर काँग्रेसवाले सांगतात की, पंडित नेहरू यांचे हात बळकट करण्यासाठी या दोघांना संसदेत पाठवा. पण तसा पाठिंबा देण्याच्या लायकीचे पं. नेहरू आहेत काय ? याचा विचार अवश्य करावा लागेल.

“याठिकाणी राज्यसभा अभिप्रेत आहे--संपादक