१४-१-१९४६ कर्तृत्ववान नसली तरी चालतील, पण निष्ठेची माणसे हवीत - Page 42

२३४

कर्तृत्ववान नसली तरी चालतील,

पण निष्ठेची माणसे हवीत

ता. १४ जानेवारी १९४६ रोजी सोलापूर येथील प्रचंड जनसमुदायासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दणदणीत असे भाषण केले. आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब म्हणाले,

निवडणुकीबबात माझ्या अस्पृश्य बांधवांना दोन शब्द सांगण्याची जरुरी मला वाटत नाही. पण काही मंडळीच्या आग्रहाखातर मला बोलावे लागत आहे. माझ्या समाजावर माझा संपूर्ण विश्वास आहे. सर्व अस्पृश्य समाज शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनच्या मागे आहे, याबद्दल मला मुळीच शंका वाटत नाही. दुसऱया कोणाला समजत नाही इतका अस्पृश्य समाज जाणता झाला आहे. त्याला हित-अहित कळते. आमची संघटना इतकी मजबूत आहे की, मी दिल्लीला बसून घंटा वाजवून इशारा दिला की, माझा समाज मी सांगितलेला आदेश निष्ठेने पाळतो.

मध्यप्रांतात हरिजनांच्या ६ जागा काँग्रेसला कशा मिळाल्या, असा आक्षेप घेतला जातो पण याला माझे उत्तर असे की, मैदानावर उतरले म्हणजे राज्य घेतले, असे कसे म्हणता येईल ? आमच्या अस्पृश्यांचा अभेद्य किल्ला मुंबई प्रांतात आहे. तो जर विरोधी पक्षांनी सर केला तर टोपी काढून शरण येऊ.

काँग्रेसचा प्रचार आज विमाने, रेल्वे व मोटारी यांच्या साहाय्याने जोरात सुरू आहे. मला त्यांना प्रश्‍न विचारावासा वाटतो.

देशातील सारी जनता आपल्यामागे आहे अशी फुशारकी नि घमेंड मारणारे हे लोक विमानाने का उडतात ? सारा देश घुसळून का काढतात ? हा धिगाणा का चालू आहे ? मी निवडणूक प्रचारासाठी अवघ्या चारपाच ठिकाणी गेलो जनता जर काँग्रेसच्या मागे आहे तर पैसे, विमाने, मोटारी घेऊन पोतराजासारखे हिंडता का ?

जनता : १९ जानेवारी, २ फेब्रुवारी १९४६.