१४-१-१९४६ कर्तृत्ववान नसली तरी चालतील, पण निष्ठेची माणसे हवीत - Page 43

कर्तृत्ववान नसली तरी चालतील, पण निष्ठेची माणसे हवीत ५

आगामी निवडणूक म्हणजे काही आटापाट्याचा खेळ नव्हे. येणारी निवडणूक

हा संग्राम आहे, हे युद्ध आहे. कौरव-पांडवांप्रमाणे ही लढाई होणार आहे.

कौरव-पांडवांचे युद्ध टाळावे म्हणून कृष्णाने शिष्टाई केली. पण सुईच्या

अग्रावरील मातीसुद्धा पांडवांना मिळणार नाही, असे घमेंडीचे उत्तर दुर्योधनाने

कृष्णाला दिले. युद्ध टाळावे म्हणून मी गांधींना पत्र लिहून तडजोडीचे प्रयत्न

केले. आपला मान सन्मान खिशात ठेवून मी समाजाचे हितासाठी पुढारपणाची

पर्वा न करता राऊंड टेबल परिषदेतल्या सामन्याची पुनरावृत्ती होऊ नये,

वितुष्ट वाढू नये म्हणून उभयतांनी राजकीय मागण्यांची तजवीज करावी

म्हणून गांधींना पत्र लिहिले. "तुमच्या आमच्यात समदृष्टिकोन नाही" असे

गांधींनी उत्तर देऊन माझी समझोत्याची मागणी अमान्य केली. मी पत्र लिहिण्यापूर्वी

काही महिने हेच गांधी, जिनांचे घरी जाऊन त्यांचे गळ्यात गळा घालीत होते.

मी विचार केला गांधी जिनांना भेटतात तर मलाही भेटतील. गांधी-जीना

यांच्यामध्ये कोणता समदृष्टिकोन होता हे राजकारण तज्ज्ञांनाच माहीत !

राज्य काही तुम्ही एकट्याने कमावले नाही. दोघांनी कमावले असे असताना

दुर्योधनाने सांगितल्याप्रमाणे सुईच्या अग्रावरील मातीही देण्यास हे गांधी तयार

नाहीत. कृष्णशिष्टाई संपल्यावर कृष्णाने दुर्योधनास सांगितले, तुमची बाजू

तुम्ही सांभाळा. गांधींनी दुर्याधनाची भूमिका पत्करल्यावर अस्पृश्य समाजात

जर काही पराक्रम, पौरुषत्व असेल तर या युद्धात शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनचे

उमेदवार निवडून देऊन 'तुमची बाजू तुम्ही सांभाळा; आमची बाजू आम्ही

सांभाळतो', असे गांधी व कॉँग्रेसला रोखठोक उत्तर दिले पाहिजे.

भावी राज्यघटना ठरविताना अस्पृश्यांची बाजू आपणच खंबीरपणे मांडणार

आहोत. हे इलेक्शन साधे नाही. मास्तरांचा पगार, शेतसारा कमी करणे,

बुंदीचे जेवण इत्यादी साध्य करण्याचे हे इलेक्शन नाही. तर इंग्रज सरकार येथून निघून गेल्यावर सत्ता कोणाचे हाती राहणार हे भावी घटनेत ठरवावयाचे आहे.

निवडणुकीची संधी साधून अनेक पोकळ जाहीरनामे निघाले आहेत. पण त्यात अर्थ नाही. जाहीरनाम्याप्रमाणे या थापेबाजांनी काहीच केले नाही तर

आपण अस्पृश्य काय करणार ? कोणाकडे रडगाणे नि दाद मागणार ? हे

भांडण सत्तेसाठी आहे.

तुकड्यासाठी दुसऱ्याच्या तोंडाकडे पाहण्याची वेळ समाजावर येऊ नये. पोटापाण्याचा प्रश्‍न सुटावा, सन्मानाने राहावयास मिळावे यासाठी राजकीय सत्तेची जरूरी असते आणि ती मिळविण्यासाठी आम्ही झगडत आहोत.