२१-४-१९५४ आपला देश दोन राष्ट्रांत विभागला आहे. एक वरच्या लोकांचे, दुसरे खालच्या लोकांचे - Page 422

३८२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

दुसऱ्या मताचे काय करणार, असा प्रश्‍न विचारण्यात येतो. त्याचा खुलासा करणे अवश्य आहे. आम्ही काँग्रेसचा विरोध करीत आहोत. तेव्हा काँग्रेसला उपयोगी पडेल असे काहीही करता कामा नये. बोरकर आणि मी दोघेही आपलेच म्हणून तुम्ही जर माझ्याबरोबर बोरकरला मत दिले, तर माझे डिपॉझिटही जप्त होईल. मी विजयी व्हावे असे वाटत असेल, तर तुम्ही . बोरकरला मुळीच मत देता कामा नये. आता उरले दोघे जण श्री. राका आणि

श्री. मेहता.

मी समाजवादी पक्षावर नाराज आहे. त्याचा कारभार अनागोंदी आहे. मला अशी आशा होती की, ते इतर देशातल्याप्रमाणे तात्त्विक बैठकीवर आपली पक्ष संघटना उभी करून पुढे येतील. म्हणून मी त्यांना गेल्या निवडणुकीत मदत केली. पण आमचे त्यात फार मोठे नुकसान झाले आहे. आमच्या लोकांनी मते दिली म्हणूनच त्यांचे उमेदवार निवडून आले. पण त्याविषयी आभाराचा साधा शब्दही त्यांनी कधी बोलून दाखविला नाही. असे असल्यामुळे मला त्यांच्याविषयी खंतही नाही आणि आदरही नाही. त्रावणकोर-कोचीनमध्ये ते कम्युनिस्टांशी खांद्याला खांदा लावून लढले आणि निवडणुकीनंतर मात्र त्यांनी पगडी फिरवून “ तुमचा आमचा संबंध नाही “ असे सांगितले. त्यांना सगळी मंत्री पदाची घाइ. |

श्रीमती सुचेता कूपलानी यांनी मला पत्र पाठवून अशोकला पाठिंबा देण्याची विनंती केली आहे. तसेच अशोक मेहतांचेही मला पत्र आले आहे म्हणून आणि अशोक हे राकांपेक्षा राजकारणात अधिक मुरलेले आणि अधिक विद्वान आहेत यासाठी त्यांना आपले दुसरे मत द्या. ते सोशॅलिस्ट पक्षाचे उमेदवार आहेत म्हणून नव्हे तर ते ” अशोक '' आहेत म्हणून तुम्ही त्यांना आपले दुसरे मत द्या.

काँग्रेसविरोधी उमेदवारांना आपण प्रचंड बहुमताने निवडून द्याल अशी मला आशा आहे.

यानंतर श्री. राजभोज यांनी आभार मानल्यावर ही प्रचंड सभा हळूहळू विसर्जन पावली. *