१४-१-१९४६ कर्तृत्ववान नसली तरी चालतील, पण निष्ठेची माणसे हवीत - Page 44

६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

पाटलाने मारले तर पोलिसापासून कलेक्टरपर्यंत एकमेकांचे सोयरे असल्यामुळे बिचाऱ्या अस्पृश्यांची दाद कोणीही घेत नाही. दिवाणही त्यांच्याच जातीचा. जन्मभर आमचा समाज गुलामगिरीतच राहणार का ? जे इंग्रजी राज्यात तेच भावी राज्यात होऊ नये म्हणूनच आम्ही झगडत आहोत. जोपर्यंत हिंदुंच्या हाती राजकीय सत्ता राहील तोपर्यंत ही गुलामगिरी नष्ट होणार नाही. या निवडणुकीत आमचे दलित फेडरेशन 'दे दान सुटे गिराण' प्रमाणे मताची भीक मागत नाही. आमचे भविष्य उज्ज्वल व्हावे म्हणून आम्हास सत्ता हवी. ती मताच्या रूपाने समाजाने आम्हाला द्यावी, आमचा तो हक्क आहे.

यावेळी अस्पृश्य समाज जागृत झाला नाही तर पेशवाईतल्याप्रमाणे कंबरेला खराटा व गळ्यात थुंकण्यासाठी मडके अडकविण्याची पाळी आल्याशिवाय राहणार नाही. दलित फेडरेशनने उभा केलेला उमेदवार निमित्त मात्र आहे. उमेदवाराशी खाजगी मतभेद, हेवेदावे विसरून दिलेले मत उमेदवाराला नसून फेडरेशनला आहे ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवावी. फेडरेशनचा उमेदवार म्हणजे प्रत्यक्षात मी उभा आहे, असे समजा.

कायदे कौन्सिलमध्ये मारवाडी, बामणाच्या मांडीला मांडी लावून १५-२० अस्पृश्य सन्मानाने बसू शकतील, असा दर्जा तुमच्यात मी निर्माण केला. या अभेद्य संघटनेस चुना, सिमेंट लावून ती मजबूत करण्याच्या मार्गावर मी आहे. आपला किल्ला अभेद्य राहील असे आपण वागले पाहिजे, हिंदू व मुसलमान या दोघांनी संगनमत केले आणि आपल्या किल्ल्यावर हल्ला केला तरी आमचा हा किल्ला अभेद्य राहील. त्याला धक्काही लागणार नाही अशी व्यवस्था मी केली,

कोणाच्या खाजगी दोषाकडे कोणी लक्ष देऊ नये. अस्पृश्यात भेदाभेद आहेत असा कांगावा करून आमच्यात फुट पाडण्याचा प्रयत्न विरोधक करीत आहेत पण वस्तुस्थिती तशी नाही. मुंबईच्या गेल्या प्राथमिक निवडणुकीत महार मतदार बहुसंख्य असता चांभार उमेदवार उभा करून त्याला निवडून आणला. काँग्रेसचे तिकीट असले तरी ब्राह्मण, ब्राह्मण उमेदवाराला व मराठा, मराठा उमेदवाराला मते देतो पण आमचे फेडरेशन हा भेद जाणत नाही.

मिनिस्टर करू, अमुक करू, तमुक देऊ अशी नानाप्रकारची आमिषे बाजूला सारून आमच्या फेडरेशनच्या मागे आमचा समाज आहे, हे सिद्ध झाले