३२३
तुमची झोपडी जिवंत राहिली
तर लोक तुमच्या आश्रयाला येतील
तारीख २६-२७ ऑक्टोबर १९५४ रोजी मुंबई प्रदेश अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनचे अधिवेशन, मुंबई येथील पुरंदरे स्टेडियमवर घेण्यात आले होते. पहिल्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिषदेला हजर राहून त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्याच दिवशी श्री. आर. डी. भंडारे यांनी ' शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनच्या कार्यकारिणीचे आणि शाखांचे विसर्जन करून नव्या निवडणुका घेण्यात याव्या ' हा ठराव डॉ. बाबासाहेबांच्या संमतीने मांडला व त्या ठरावाला पुण्याचे श्री. आर. आर. भोळे यांनी पाठिंबा दिला. सदर ठराव बहुमताने व टाळ्यांच्या गजराने पास करण्यात आला. या ठरावामुळे फेडरेशनच्या कार्यकर्त्यांमधील असंतोष कमी झाला यात तिळमात्र शंका नाही. कारण सध्याचे पदाधिकारी १९४५ मध्ये नेमले गेले होते आणि तेव्हापासून ते जागा अडवून बसल्यामुळे इतर कार्यकर्ते अस्वस्थ झाले होते. नव्या निवडणुका ६ महिन्यांच्या आत होणार आहेत.
पहिल्या दिवशी दिनांक २६ ऑक्टोबर १९५४ रोजी परिषदेला मार्गदर्शन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
मित्रहो,
ज्या कार्याकरता आपण ही सभा भरविण्याचे ठरविले होते तो उद्देश सभासंचालकांना पूर्णपणे समजलेला दिसत नाही. नाहीतर ही आता जी सभा चव्हाट्यावर भरली आहे ती कुठे तरी गुप्त ठिकाणी भरली असती. मला कार्यकर्त्यांना बरेच सांगावयाचे होते परंतु ते गुप्त सांगावयाचे होते. आता मी जे सांगणार आहे ते स्पष्टपणे सांगणार नाही. त्याचा मी फक्त मतितार्थ सांगणार आहे. . शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनमध्ये जी घाण साचली आहे ती उपसण्याचा माझा इरादा होता. म्युनिसीपालिटीची गटारे साचली म्हणजे कशी घाण होते त्याप्रमाणे शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनमध्ये घाण निर्माण झाली आहे. ती घाण गुप्तपणे उपसावयास पाहिजे होती. शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनच्या राजकारणाला १९१९ सालापासून सुरूवात झाली. त्याचे
जनता : ६ नोव्हेंबर १९५४.