३९६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
नाही. भोळे यांनी जर आम्हाला पैसा पुरविला तर वर्षातून काय परंतु सहा महिन्यांनीसुद्धा आम्ही परिषदा घेऊ. तसे पैसे देऊन भोळ्यांनी पुण्याला बोलवावी बैठक ! काँग्रेससारख्या संस्थेजवळ पैसा आहे, आम्हाला पैशाची अडचण आहे. काही लोक म्हणतात आपण सरकारवर टीका करू नये, त्याचेशी सहकार्य करावे. आमचे हक्क पदरात पाडणे, हेच आमचे पहिले काम आहे. ते हक्क जर पदरात पडत नसतील तर आम्ही टीका करणारच. सरकारवर टीकाच नसेल तर दलित फेडरेशनची आवश्यकता तरी काय आहे? सरकार काय, देव आला तरी आम्ही त्याच्यावर टीका करूच. ज्यांना हे पसंत नसेल त्यांनी दलित फेडरेशन सोडून जावे. आम्ही सरकारशी सहकार्य केले नाही काय? मी चार वर्षे त्याच्याबरोबर नव्हतो का ? आम्ही वेळोवेळी सहकार्य देत आलो आहोत. सरकार जर आमच्याकरिता काही करणार नसेल तर आम्ही सदोदित टीका करू. आम्ही गप्प का बसावे ? |
लोक सांगतात की दलित फेडरेशन चढाव करत नाही. चढाव म्हणजे काय ? चढावाचे राजकारण आम्हाला पचणार आहे काय ? आम्ही चढाव केला तर त्याचा तुम्हालाच त्रास होईल. आम्ही तुरूंगात जाऊन बसलो तर तुम्हालाच लोक छळतील. तुम्ही आंबेडकरांना मदत करता काय बेट्यांनो ? तुमचे पाहून घेऊ, असे म्हणून तुम्हालाच त्रास देतील. यापेक्षा तुम्ही कष्ट करा. कष्ट करणे हा माझा धर्मच होऊन बसला आहे. मला अजून विश्रांती मिळाली नाही आणि मी विश्रांतीही घेत नाही. दुसरी गोष्ट आपले मन निर्मळ पाहिजे. त्यामुळे आपसातील मतभेद नाहीसे होतात. दलित फेडरेशनमध्ये मुख्य वाद आहे तो डॉ. आंबेडकरानंतर मुख्य कोण ? याचा अर्थच मला कळत नाही. मी मरण्याचे अगोदरच हा वाद निर्माण झाला आहे. म्हणजे मी लवकरच मरावे की जगावे असा प्रश्न माझ्यापुढे निर्माण होतो. बरे हा वाद तर मिटविलाच पाहिजे, यावर मी एक उपाय शोधून काढला आहे. हा वाद मिटविण्याकरिता दलित फेडरेशनच्या पुढाऱ्यांचे आणि मेंबर्सचे इलेक्शन झाले पाहिजे. तरच हा वाद मिटेल. जो काम करतो तोच खरा पुढारी. लोकांना माहीत आहे. खरा पुढारी कोण ? काम केले तर लोक खरा पुढारी कोण हे समजू शकतात. ही पद्धत अंमलात आणण्याकरिता चार आण्याची वर्गणी आम्हास नको. दलित फेडरेशनमध्ये पैसे खाण्याची प्रवृत्ती फार प्रमाणात शिरली आहे. म्हणून काँग्रेससारखे चार आण्याचे बंधन आम्हास नको. प्रत्येक अस्पृश्य माणूस हा दलित फेडरेशनचा सभासद आहे. तो जरी तसे म्हणाला नाही तरी तसे आम्ही समजणार. अशा रीतीने प्रत्येक गावातील लोकांनी आपल्या गावातील पाच लोक निवडून द्यावे. याप्रमाणे सर्व